राळेगण थेरपाळ जवळा परिसरात वाऱ्यासह अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी : सरपंच पंकज कारखिले प...
राळेगण थेरपाळ जवळा परिसरात वाऱ्यासह अवकाळी पाऊस
वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत
शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी : सरपंच पंकज कारखिले
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जवळा परिसरात सकाळपासूनच वातावरणात उन्हाचा उकाडा जाणवत होता; दुपारनंतर अचानक पावसाचे वातावरण तयार होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने हजेरी लावली. लोकांची त्रेधा उडाली.
जवळा, राळेगण, थेरपाळ, शिरुर रस्त्यावर काही ठिकाणी दुतर्फा मोठमोठी झाडे उन्मळून पडली. यामुळे सुमारे एक तास रस्ता वाहतूक विस्कळीत झाली. ग्रामस्थांनी काही ठिकाणी हालचाली करत जेसीबी यंत्राच्या सहाय्याने झाडे बाजूला केल्याने रस्ता मोकळा झाला, तर विजेच्या तारा तुटल्या घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.
कुरुंद, कोहकडी, राळेगण, थेरपाळ परिसरात वादळाने धुमाकूळ घालत सुमारे वीस विजेचे पोल मोडून तारा तुटून रस्त्यावर,वस्तीवर गावात सर्वत्र पडल्या. यामुळे परिसरातील वीजप्रवाह खंडित झाला. दरम्यानच्या काळात राळेगण येथील लाईनमन लोंढे यांनी प्रसंगावधन राखत त्वरित विजेचे मुख्य फीडर बंद केल्याने पुढील
दुर्घटना टळल्या.सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग इतका जोरदार होता की, काही व्यावसायिकांच्या टपऱ्या उडून शंभर ते दीडशे फूट बाजूला पडल्या, तर काही रस्त्यावर आल्या.
त्यामुळे नागरिक भयभीत झाले, तरी नुकसान ग्रास्थांना प्रशासनाने पंचनामे करून भरपाई मिळण्याची मागणी केली.
जवळा व राळेगण थेरपाळ परिसरात झालेल्या पावसाने अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले. अनेक व्यावसायिकांचे दुकानाचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाल्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना व गोरगरिबांना भरपाई द्यावी. अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने मी करत आहे.
पंकज कारखिले (सरपंच, राळेगण थेरपाळ)