टाकळी ढोकेश्वर सेवा सोसायटीत विजयी कोण होणार ? आज मतदान पारनेर प्रतिनिधी : टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अटितटीच्या निवडणु...
टाकळी ढोकेश्वर सेवा सोसायटीत विजयी कोण होणार ? आज मतदान
पारनेर प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अटितटीच्या निवडणुकीसाठी आज बुधवार दि. १५ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी एक हजार १५ सभासद असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड व सचिव विजय गायकवाड यांनी दिली आहे. टाकळी ढोकेश्वर येथील प्राथमिक शाळेत बुधवारी सकाळी ८ ते ४ या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ ते ५ दरम्यान निकाल घोषित करण्यात येणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड यांनी सांगितले.
सेवा संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ढोकेश्वर सहकारी पॅनल व शिवसेना व भाजप प्रणित जनसेवा पॅनल यांच्यामध्ये सरळ लढत होणार असून राजकीय दृष्टया महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेची पंचवार्षीक निवडणूकीत १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची चिन्हे आहेत.
टाकळी ढोकेश्वर येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेची पंचवार्षीक निवडणूकीत रंगत वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके प्रणित श्री ढोकेश्वर शेतकरी सहकारी पॅनल आणि खासदार सुजय विखे पाटील, भाजप व शिवसेना प्रणित जनसेवा पॅनल अशी सरळ सरळ लढत होणार आहे. सेवा संस्था निवडणूकीत नवीन १३९ मतदारांची भर पडल्याने या निवडणूकीत चुरस वाढली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या सेवा संस्थेवर सत्ता असणाऱ्याच्याविरोधात आ. लंके यांच्या कार्यकर्त्यांनी शडू ठोकला असून सभासद मतदार राजा कुणाला कौल देतो, हे बुधवारी सायंकाळपर्यंत समजणार आहे.
COMMENTS