पारनेरातून तरुणीच्या हातातील मोबाईल चोरला पारनेर/प्रतिनिधी : पारनेर - कान्हूर रस्त्यावर बसची वाट पाहत असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाईल दुच...
पारनेरातून तरुणीच्या हातातील मोबाईल चोरला
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर - कान्हूर रस्त्यावर बसची वाट पाहत असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून सुसाट आलेल्या अज्ञात तरुणाने लांबविला. पारनेर शहरातील मिलन चौकात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
यासंदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार मंगळवार दि. ३१ मे रोजी करंदी येथील मुलगी वय २३ ही तरुणी करंदी येथे जाण्यासाठी पारनेर शहरातील मिलन चौकात उभी होती. ती बसची वाट पाहत असताना स्प्लेंडर मोटारसायकल वरून निळया व काळया रंगाचा टी शर्ट घातलेला एक तरूण भरधाव वेगाने तरूणीजवळ आला. व तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार झाला.
तरूणीने घडलेली हकीगत कुटूंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी पारनेर पोलिस ठाण्यात येऊन अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला. अज्ञात चोरटयाने १५ हजार रूपयांचा व्हिवो कंपनीचा टी १ मॉडलेचा स्काय ब्लु रंगाचा मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद मुलीने दिली आहे.
नगर ग्रामीण विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे यांनी पारनेर येथे दिलेल्या भेटीप्रसंगी या गुन्हयाची माहिती घेऊन तपासासंदर्भात सुचना दिल्या. मोबाईल अथवा सोनसाखळी लांबविण्याच्या घटना आजवर पारनेर तालुक्यात घडल्या नव्हत्या. या घटनेमुळे असे रॅकेट तालुक्यात सक्रिय झाले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिस निरिक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक काळे हे पुढील तपास करीत आहेत.