पारनेरमध्ये मोबाईल हिसकावणारे दोघे गजाआड; पोलिसांची बेधडक कारवाई पारनेर/प्रतिनिधी : पारनेर शहरात धूमस्टाईलने मोटरसायकल वर येऊन मोबाईल हिसका...
पारनेरमध्ये मोबाईल हिसकावणारे दोघे गजाआड; पोलिसांची बेधडक कारवाई
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर शहरात धूमस्टाईलने मोटरसायकल वर येऊन मोबाईल हिसकावणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अब्दुल महेंदरदीन खान आणि सुखचेन केसरसिंग (दोघे रा. छत्रपतीनगर, तपोवन रोड, अहमदनगर ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १५ हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी कोमल जाधव (रा. करंदी, पारनेर ) या पारनेर शहरातील मिलन चौकात गाडीची वाट पाहत असताना आरोपींनी मोबाईल बळजबरीने हिसकावून चोरला होता. या संदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना अब्दुल खान याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा लाऊन आरोपी खानला ताब्यात घेतले असता त्याने केसरसिंगच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी खान आणि केसरसिंगला पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे पोहेकॉ संदीप पवार, पोना. शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ. योगेश सातपुते, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ. संभाजी कोतकर यांनी ही कारवाई केली.