पारनेर कारखाना जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश जमिनीचे बेकायदेशीर आदलाबदल प्रकरण पारनेर प्रतिनिधी : पारनेर पारनेर सहकारी साखर कारखान्याच्...
पारनेर कारखाना जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश
जमिनीचे बेकायदेशीर आदलाबदल प्रकरण
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या ३० एकर जमीन अदलाबदल गैरव्यहाराच्या चौकशीचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहेत. अवसायनात असलेल्या पारनेर साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेने विक्री केल्यानंतर कारखाना विकत घेणारे खासगी खरेदीदार क्रांती शुगर यांच्या दोन वर्षानंतर लक्षात आले की पारनेर साखर कारखाना उभा असणारे गट क्रमांक ४४४ व ४५८ राज्य सहकारी बँकेकडे तारण नव्हते व ते सध्या आपल्या मालकीचे नाहीत, त्यामुळे कारखाना विकत घेतला असला तरी त्याखालील जमीन आपल्या मालकीची नाही. सदर जमीन पारनेर म्हणजेच अवसायक यांच्या नावावर होती.
त्यानंतर पुढे क्रांती शुगर यांनी पारनेरचे अवसायक राजेंद्र फकिरा निकम यांना हाताशी धरून सदर जमिनीचे अदलाबदल करण्याचे ठरवले व ठरल्याप्रमाणे पारनेरच्या अवसायकाने सदर जमीन अदलाबदलीचा प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालक अहमदनगर, साखर आयुक्त पुणे यांच्यामार्फत राज्य सरकारकडे पाठविला. राज्य शासनाचे उपसचिव यांनी २ ऑगस्ट २०१८ रोजी या प्रस्तावाला मान्यता देऊन तसा शासन आदेश काढला.
शासन आदेशानुसार अवसायक पारनेर यांनी पारनेरची कारखाना उभा असलेली सुमारे ३० एकर जमीन क्रांती शुगरला तर त्यांची ३० एकर पारनेरला विना मोबदला अदलाबदल दस्त करून ताबा दिला. या संपूर्ण गैरव्यवहाराची तक्रार पुढे पारनेर कारखाना बचाव समितीने शासन - प्रशासनाकडे केली होती. परंतु त्यांची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
अवसायकाच्या ताब्यात आजही सुमारे १४० एकर जमीन शिल्लक आहे. आता या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रांत अधिकारी पारनेर- श्रीगोंदा यांना दिले आहेत.