वेब टीम : मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या...
वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत राज्याच्या २०२२-२३ च्या २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्याला मंजूरी देण्यात आली.
यामध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी ५ लाख २२ हजार ६८ कोटी रुपयांच्या, तर इतर क्षेत्रासाठीच्या २१ लाख १० हजार ९३२ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात ४५ पूर्णांक ३७ शतांश टक्के वाढ केली आहे.
प्राधान्य क्षेत्रासाठीच्या निधीमध्ये कृषी क्षेत्रासाठी १ लाख २६ हजार ५८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यात पिक कर्जासाठी ६४ हजार कोटी, तर मुदत कर्जाच्या ६२ हजार ५८ कोटी रुपयांचा समावेश आहे.
पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्जाची तातडीनं आवश्यकता आहे, ही बाब लक्षात घेऊन बँकांनी मिशन मोडवर शेतकऱ्यांना पिक कर्जाचं वाटप करावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. आवश्यक असेल तर स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत, असं त्यांनी सागितलं.
कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांचा वेगानं विकास होण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून महाराष्ट्राला अधिकाधिक निधी देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. केंद्र शासनानं बँकांना पिक कर्जापोटी दिला जाणारा २ टक्क्याचा व्याज परतावा पूर्ववत सुरु ठेवावा असा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
COMMENTS