जामगाव ग्रामपंचायतचे स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष; ग्रामस्थ आक्रमक ग्रामपंचायतचे बेजबाबदारपणे सुरू आहे कामकाज पारनेर प्रतिनिधी : जामगाव ग्र...
जामगाव ग्रामपंचायतचे स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष; ग्रामस्थ आक्रमक
ग्रामपंचायतचे बेजबाबदारपणे सुरू आहे कामकाज
पारनेर प्रतिनिधी :
जामगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध स्थानिक प्रश्न हे आवासून उभे असताना ग्रामपंचायत व प्रशासन बेजबाबदारपणे कामकाज करत असल्याचा थेट आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. गावात नैसर्गिकरित्या नुकसान झाल्यास ग्राम स्तरावरून कोणत्याही प्रकारे पाठपुरावा केला जात नसून स्थानिक प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत व सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे सहकार्य केले जात नसल्याचा थेट आरोपच ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून गावामध्ये वीज पुरवठ्याचे भारनियमन सुरू असतानाही उपकेंद्रावर कोणत्याही प्रकारे साधी विचारपूसही गावातील ग्रामपंचायत व सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली नाही सर्वजण बेजबाबदारपणे कारभार करत असून फक्त हार तुरे आणि सन्मान घेण्यामध्येच ते गुंतले आहेत असा आरोप ग्रामपंचायत सत्ताधारी व प्रशासनावर करण्यात आला आहे.
विजेचा झालेला खेळखंडोबा लक्षात घेता भाळवणी ढवळपुरी भांडगाव या परिसरातील प्रत्येक गावातील सरपंच हे वीज उपकेंद्रावर निवेदन देण्यासाठी व विजेच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी उपस्थित होते. परंतु जामगावचे सरपंच यांनी या प्रश्नाकडे थेट कानाडोळा केला. विजेच्या संदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी असतानाही त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचे लक्षात येते. जामगाव ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे संचालक यापैकी कोणीही वीज उपकेंद्रावर निवेदन देण्यासाठी उपस्थित नव्हते.
सरपंच ग्रामपंचायत सदस्य व सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी हे स्थानिक पातळीवर बेजबाबदारपणे काम करत आहेत असा आरोप मनोज शिंदे, बाळासाहेब शिंदे, उत्तम चौधरी, चैतन्य खाडे, रमेश मेहेर, दिनकर सोबले, आनंद चौधरी, संकेत सोबले, दत्तात्रय चौधरी, सागर चौधरी, अरुण शिंदे, जालिंदर खाडे, शिवाजी मेहेर, राजू नाईक, समीर मांढरे, अरुण धुरपते, विजय धुरपते, शिवा धुरपते, रमेश पवार, डी. एन घावटे यांनी केला. विजेच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी जामगाव येथील फक्त स्थानिक ग्रामस्थ भाळवणी वीज उपकेंद्रावर उपस्थित होते. त्यामुळे जामगाव ग्रामपंचायत मध्ये नेमका काय चाललंय हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.