माझा आरोग्याशी जवळचा संबंध : राजकारण होत असेल तर हॉस्पिटलचे स्थलांतर राजकीयवादात आता आमदार नीलेश लंके यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. प...
माझा आरोग्याशी जवळचा संबंध : राजकारण होत असेल तर हॉस्पिटलचे स्थलांतर
राजकीयवादात आता आमदार नीलेश लंके यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पारनेर नगरपंचायतने विशेष सभा घेत नीलेश लंके प्रतिष्ठानला हॉस्पिटल बांधण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला शिवसेना नगरसेवकांनी विरोध केला. एखाद्या खासगी प्रतिष्ठानला शासकीय जमीन दिली जाऊ नये. ही जमीन गोरगरिबांसाठीच्या विकासकामांसाठी व शासकीय उपक्रमांसाठी वापरली जावी असे शिवसेना नगरसेवकांचे म्हणणे आहे. शिवसेना नगरसेवकांनी बंदची हाक दिली त्यानुसार पारनेर एक दिवस बंद होते. या राजकीयवादात आता आमदार नीलेश लंके यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
या जमीनवादावर आमदार लंके यांनी आज पारनेरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष विजय औटी उपस्थित होते. आमदार नीलेश लंके म्हणाले, शहरात सरकारी जागेत गोरगरीब व गरजू जनतेसाठी मोफत व सर्व सुविधायुक्त असे सुमारे एक हजार शंभर कोटी रुपयांचे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा माझा मानस होता. परंतु या सामाजिक व विधायक उपक्रमाला केवळ राजकीय हेतूने विरोध होत असेल तर पारनेर शहर सोडून इतर ठिकाणी रुग्णालय स्थलांतरित करण्याचा निर्णय मी घेत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, मागील दोन वर्षांच्या कोरोना काळात जवळपास 35 हजार रुग्णांना मोफत औषध उपचार करून बरे केले. सध्या दिवसभरात किमान दहा तरी रुग्ण माझ्याकडे उपचारसाठी येतात. त्यामुळे उपचारासाठी अहमदनगर अथवा पुण्याला जाण्याऐवजी जर पारनेर शहरात अद्यावत रुग्णालय उभारले तर आपल्या जनतेची सोय होईल. नागरिकांचे पैसे वाचतील. हा माझा हेतू होता, असे त्यांनी सांगितले.
मतदार संघातील जनतेचे आरोग्य व शिक्षण, रोजगार यांना प्राधान्य देणारा मी आहे. मी कोरोना काळात अनेक लोकांना मदतीचा हात दिला. अनेक रुग्णांना उपचारासाठी मदत केली आहे. आरोग्याशी माझा जवळचा संबंध आला आहे. गोरगरीब व गरजू लोकांसाठी अद्यावत रुग्णालय उभारण्याचा मानस मी केला आहे. त्यादृष्टीने पारनेर येथे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम सुरू करणार आहे.
अद्यावत रुग्णालयामुळे पारनेरचा चेहरा मोहरा बदलणार आहे. नगरपंचायतकडे ना हरकत दाखला मागितला होता. त्या वेळी आमच्या गटाचे 12 पैकी दोन नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे या रुग्णालयाच्या उभारणीसाठी 10 नगरसेवक आमच्या बरोबर आहे. त्यामुळे नगराध्यक्ष विजय औटी व इतर नगरसेवकांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला आहे. शहरात सामाजिक उपक्रमास विरोध होत असेल तर दुसरीकडे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील जनतेसाठी अद्यावत पाचशे बेडचे रूग्णालय उभारणीचा मानस आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ या रुग्णालयाच्या माध्यमातून मिळवून देण्यात येतील, असे आमदार लंके यांनी सांगितले.
देवस्थानच्या जागेत बंगले बांधले तेथे अवैध धंदे करतात त्यांना विरोध होत नाही व जे लोक समाजासाठी सेवाभावी उपक्रमातून रुग्णालय उभारणीस विरोध करतात त्यांचे समाजासाठी योगदान काय. या पाठीमागे राजकीय बळ विरोधक देत आहेत. समाजाशी संबंध नसणाऱ्या माणसांचा हा विरोध आहे.
- आमदार नीलेश लंके