भोयरे गांगर्डात तरटे वस्तीवर दरोडा; दांपत्य गंभीर जखमी पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डात चोरीसह दरोड्याचे सत्र सुरूच अस...
भोयरे गांगर्डात तरटे वस्तीवर दरोडा; दांपत्य गंभीर जखमी
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डात चोरीसह दरोड्याचे सत्र सुरूच असून अमृत पवार यांच्यावर चोरीच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड घालून केलेला जीवघेणा हल्ला ताजा असतानाच शनिवारी रात्री १ ते पहाटे ६ च्या दरम्यान तरटे वस्तीवर दाम्पत्यांना चोरट्यांनी जबर मारहाण केली. १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. यात पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी शेतीचे कामे आटपून सायंकाळी गायांचे दुध काढून तरटे कुटुंबातील संजय भाऊसाहेब तरटे (वय ५४) व चंद्रकला संजय तरटे (वय ४७) हे जेवणानंतर घराचे दरवाजे बंद करून झोपले असता रात्री एकच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराजवळ प्रवेश केला. दरवाजा जवळ येऊन त्यांनी दादा दरव-ाजा उघडा असा आवाज दिल्यानंतर संजयतरटे यांनी आपल्या नावासह आवाज दिल्यामुळे कोणीतरी ओळखीचे असेल म्हणून दरवाजा उघडला तर चार ते पाच जणांनी घरात प्रवेश केला. संजय तरटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. घरात ठेवलेले दागिने व रोख काढून दे, असे चोरट्यांनी धमकावले.
यादरम्यान तरटे आणि चोर यांच्यात चांगलीच झटापट झाली. यादरम्यान त्यांची पत्नी चंद्रकला यांना जाग आली असता यांनी देखील विरोध केला. यादरम्यान एकाने संजय तरटे यांच्या डोक्यात डोळ्यावर व पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यात तरटे हे खाली कोसळल्यानंतर चोरट्यांनी पत्नी चंद्रकला यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघांनी कपाट उघडून उचकापाचक केली तर एकाने घरातील किराणा, धान्य, भांडी घराबाहेर फेकून दिले. घराला बाहेरून कडी लावली. घरा- तील सुमारे तेरा तोळे सोने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
तरटे दाम्पत्यांना चोरट्यांनी केलेल्या जबरी मारहाणीत दोन्ही पती पत्नी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सकाळी ९:३० ते १० दरम्यान सर्जे राव रसाळ व विजय गायकवाड यांना तरटे यांना आवाज दिला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी दवाखान्यातहलविण्यात आले.
दरम्यान, सुपा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व पंचनामा केला. अहमदनगर येथून ठसे तज्ञ व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा मुलगा अमोल संजय तरटे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिस स्टेशनला जबरी चोरी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..