माजी आमदार विजय औटी अॅक्शन मोडमध्ये पारनेर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात सोडले मौन समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पारनेर प्रतिनिध...
माजी आमदार विजय औटी अॅक्शन मोडमध्ये
पारनेर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात सोडले मौन
समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
पारनेर प्रतिनिधी :
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व पारनेर तालुक्याचे माजी आमदार विजय औटी यांनी अखेर मौन सोडले. पारनेर येथे शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यात त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते यांचा मोबाईल द्वारे संवाद घडवून आणला.
या वेळी आम्ही तुमच्याच बरोबर आहोत अशी ग्वाही औटी यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील शिवसेना सध्या तरी ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
राज्यातील शिवसेनेमध्ये फूट पाडल्याने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा गट शिवसेनेतून फोडल्याने राज्यभरात शिंदे गटाकडे कोण व ठाकरे गटाकडे कोण याची चर्चा सुरू झाली.
राज्यातील अनेक राजकीय नेते मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडे जाणार अशी चर्चा सुरू झाली.
त्याच वेळी अनेक नेते ठाकरे यांना सोडून शिंदे गटात सामील झाले. मात्र निष्ठावान सामान्य शिवसैनिकांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्याच बरोबर आहोत अशा प्रकारे ठाकरे यांना ग्वाही दिली आहे.
राज्यातील महानगरपालिका नगरपालिका तसेच नगरपंचायत मधील अनेक नगरसेवक नगराध्यक्ष हे शिंदे गटाकडे गेले आहेत मात्र तळागाळातील निष्ठावान शिवसैनिकांनी ठाकरे यांच्याबरोबरच राहण्याचे पसंत केले आहे .
दोन दिवसापूर्वी पारनेर येथे माजी आमदार औटी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शिवसेनेचे शाखा, गट व विभाग प्रमुख यांची बैठक झाली या बैठकीत औटी यांनी मोबाईल द्वारे थेट मातोश्रीवर संपर्क करून ठाकरे व उपस्थित शिवसैनिक यांच्यात संवाद घडून आणला.
यावेळी ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शनही केले. सध्या काळ कठीण आहे तुमची मला साथ हवी आहे. मला तुमची गरज आहे यापुढील निवडणुका आपणाला सर्व ताकतीनिशी लढावयाच्या आहेत असे सांगत धनुष्यबाण आपलाच आहे व आपलाच राहील असे सांगत भावनिक साद घातली यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
अनेकांना अश्रू अनावर झाले. या वेळी सर्वांनी आम्ही तुमच्याच बरोबर आहोत अशी ग्वाही दिली.
एकंदरीत पारनेर तालुक्यातील शिवसेना तरी निश्चितच ठाकरे यांच्या पाठीशी अभ्यद्द्यपणे उभी आहे याची जाणीव कालच्या मेळाव्यातून झाली. माजी आमदार औटी हे पारनेर तालुक्यातून तीन वेळा शिवसेनेतुन निवडून विधानसभेवर गेले होते.
औटी हे शिवसेनेच्या चिन्हावर उभे राहिले आणि सलग तीन वेळा त्यांनी शिवसेनेचे विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले इतकेच नव्हे तर शेवटच्या टप्प्यात त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष पद ही भूषवले.
एक अभ्यासू व हुशार राजकारणी नेते म्हणून औटी यांच्याकडे पाहिले जाते. ते शिवसेनेतील एक वजनदार नेते होते त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचा एक गट वेगळा केल्यानंतर व शिवसेनेत फूट पडल्यानंतर तालुक्यात औटी हे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते.
मात्र काल झालेल्या मेळाव्यात औटी यांच्यासह सर्व कार्यकर्ते ठाकरे यांच्याच गटात राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र आगामी काळात येऊ घातलेल्या विविध निवडणुकांमध्ये औटी काय भूमिका घेतात कोणाशी युती करतात की स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार हे मात्र आत्ताच सांगता येत नाही.
मात्र औटी यांची भूमिका आगामी काळात व राजकारणात निर्णायक ठरू शकते त्यामुळे त्यांच्या भूमीकडे तालुक्यातील राजकीय नेत्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.