भंडारदरा व मुळा हे नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण धरणे किती टक्के भरले ? अहमदनगर प्रतिनिधी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल...
भंडारदरा व मुळा हे नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण धरणे किती टक्के भरले ?
अहमदनगर प्रतिनिधी :
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात सध्या भंडारदरा धरण 80 टक्के भरले आहे. तर मुळा धरणाचा पाणीसाठा 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी 199 मिमी पाऊस झाला असून 44.4 टक्के पाऊस झाला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली. कमी ओलीवर शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. नंतर काही दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दरम्यान काही प्रमाणात झालेल्य पावसामुळे शेतकर्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. उत्तर भागातील भंडारदरा व मुळा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार होत असलेल्या पावसामुळे धरण साठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सोमवारी प्रवरा नदीत भंडारदरा धरण 8,35 क्यूसेस, निळवंडेतून 8,00 क्यूसेस, ओझर बंधार्यातून 2,122 क्यूसेसने पाणी सुरु आहे. गोदावरी नदीत - नांदूर मध्यमेश्वर बंधार्यातून 23,451 क्यूसेस, भिमा नदी - दौंड पूल 29,288 क्यूसेस, कुकडी नदी - येडगाव धरणातून 7,00 क्यूसेसने विसर्ग सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी पुन्हा हवामान खात्याने मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
प्रवरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
भंडारदरा धरणात सध्या 8843 एमसीएफडी (80.11%) एवढा पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे, भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढली असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाच्या गेटमधुन/सांडव्याद्वारे प्रवरा नदीमध्ये अशीच आवक चालू राहिल्यास नजीकच्या काळात पुरपाणी सोडावे लागणार असल्याने अकोले व संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी काठच्या दोन्ही तिरावरील लोकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.