गोरेगाव मध्ये बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्यांचा शोध लागेना ! पारनेर प्रतिनिधी : पारनेर ...
गोरेगाव मध्ये बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्यांचा शोध लागेना !
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे बिबटयाचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने परीसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सुतकडा वस्ती परिसरात बिबट्याचा वावर असून गेल्या वर्षभरापासून अनेक स्थानिक ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. या अगोदरही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच परिसरात बिबट्याला जेरबंद केले आहे. या ठिकाणी राहणारे सोमनाथ तांबे हे
सोमवारी सकाळी गावामध्ये येत असताना ओढ्यामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. या परिसरामध्ये तीन ते चार बिबट्यांचा वावर असून वाघाचाही वावर असल्याची माहिती सोमनाथ तांबे यांनी दिली.
सुतकडा वस्तीवर दोन दिवसापूर्वी वाघाचा वावर असल्याचा सोशल मीडिया वरती फोटो व्हायरल झाला होता मात्र तो फोटो कोणी काढला या बद्दलही सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा चालू आहे या परिसरात या वर्षात शेतकऱ्यांच्या कोंबड्या, शेळ्या, कुत्रे, वासरे, गाया या प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केलेला आहे. झालेल्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वन विभागाच्या अधिकान्यांनी पंचनामा केलेला आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी गोरेगावच्या सरपंच सुमनताई बाबासाहेब तांबे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन सरपंच सुमनताई तांबे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना केले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्यांचा शोध लागेना..!
गोरेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असताना अनेक भागांमध्ये शेतकरी वर्गाच्या प्राण्यांवर हल्ला बिबट्यांने केला आहे. यामध्ये लाखो रुपयांची नुकसान शेतकऱ्यांची झाली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी हालचाली सुरू कराव्यात. सुतकडा परिसरात बिबट्यांच्या वावरामुळे भयभीत वातावरण झाले आहे.