काकणेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी दगावली बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा बसवा ग्रामस्थांची मागणी पारनेर प्रतिनिधी : बिबट्याचा वाढता वावर यामु...
काकणेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी दगावली
बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा बसवा ग्रामस्थांची मागणी
पारनेर प्रतिनिधी :
बिबट्याचा वाढता वावर यामुळे तालुक्यातील काकणेवाडी येथे सोमवारी पहाटे बिबट्याने शेळीचा फडशा पाडला यात शेळी दगावली असून भरवस्तीत बिबट्याने हल्ला केल्याने काकडेवाडी ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान काकणेवाडी येथे विष्णू जबाजी वाळुंज यांच्या गोठ्यात पहाटे ५ च्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला असता शेळी ओरडली म्हणून सुनिता दत्तात्रय वाळुंज या घरातून बाहेर आल्या आल्यानंतर बल्बच्या उजडा मध्ये त्यांना बिबट्या गोठ्याच्या भिंतीवरून उडी मारताना दिसला त्यानंतर शेळी मृत अवस्थेत आढळली. सदर घटनेची माहिती टाकळी ढोकेश्वर वनाधिकारी यांना देण्यात आली. त्यानंतर वनपाल एस. एन. भालेकर, वनरक्षक व्ही. एन. थोरात, के. एल. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. बिबट्याच्या या हल्ल्यात या शेतकऱ्याचे १० ते १२ हजार रुपयांचे नुकसान झाले असून वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली.
पारनेर तालुक्यातील काकणेवाडी, तिखोल, भोंद्रे, टाकळी ढोकेश्वर, निवडुंगेवाडी, वासुंदे, खडकवाडी, गुरेवाडी, म्हसोबाझाप, कासारे या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेळी, मेंढ्या, गाई आदी प्राण्यांवर हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. तर नगर-कल्याण महामार्ग दोन दिवसांपूर्वी एक बिबट मादीने आपल्या पिलांसहित सहकुटुंब दर्शन येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी व चार चाकी प्रवाशांना दिले होते. त्यामुळे बिबटचे प्रमाण टाकळी ढोकेश्वर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढत चालले असून तातडीने या प्रमुख गावांमध्ये पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी या ग्रामस्थांकडून वनविभागाकडे केली जाऊ लागली आहे.
तसेच भक्ष्य व पाण्याच्या शोधार्थ सुद्धा मानवी वस्तीकडे या बिबट्याने आपला मोर्चा वाळविला आहे.
काकणेवाडी येथे घडलेल्या घटनास्थळावर यावेळी माजी सरपंच गीताराम वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी वाळुंज, जयवंत वाळुंज, पोपट वाळुंज, सुभाष वाळुंज, गणेश ठुबे, ग्रामसेवक वंदना मोरे तलाठी वृषाली कदम हे उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.