📌 जि.प. आरक्षणाची गुरुवारी सोडत ! ■ पंचायत समितीचे १३ जुलैला आरक्षण ■ निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर ■ इच्छुकांची धाकधूक वाढली अहमदनगर प्र...
📌 जि.प. आरक्षणाची गुरुवारी सोडत !
■ पंचायत समितीचे १३ जुलैला आरक्षण
■ निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर
■ इच्छुकांची धाकधूक वाढली
अहमदनगर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची अंतिम गट आणि गण रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता या गट आणि गणांची आरक्षण सोडत होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. ५) रात्री कार्यक्रम जाहीर केला आहे.
अहमदनगरसह राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या गट आणि गणांच्या आरक्षणाची सोडत आता बुधवारी (दि.१३) काढण्यात येणार आहे. गट व गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खर्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. गट-गण आरक्षित झाल्यास पुढे काय? हाही प्रश्न बर्याच जणांना सतावत आहे.
निवडणूक आयोगाने दि. २७ जूनला अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर सर्वांच्या नजरा जिल्हा परिषदांचे गट व पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. कारण या आरक्षण सोडतीनंतरच खर्या अर्थाने गट आणि गणांचे चित्र स्पष्ट होणार असून इच्छुकांना मोर्चेबांधणी आणि निवडणुकीची तयारी करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणार्यांसाठी ही आरक्षण सोडत अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केलेले असल्याने ही आरक्षण सोडत अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण
महिला यांच्या करिता जागा निश्चित करण्यासाठीच काढली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. ५) रात्री जाहीर केलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी यांनी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे- दि. ७ जुलै, जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत तहसील कार्यालय येथे दि. १३ जुलै रोजी काढणे, आरक्षण सोडतीनंतर प्रारूप अधिसूचना दि. १५ जुलै रोजी प्रसिद्ध करणे, त्यावर दि. २१ जुलै पर्यंत हरकती मागविणे. आरक्षण सोडतीचा अहवाल व प्राप्त हरकती यावर अभिप्राय जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी दि. २५ जुलै पर्यंत सादर करणे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून दि. २ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १२ गट आणि पंचायत समित्यांचे २४ गण वाढले आहेत. गट वाढल्याने तालुक्यातील आरक्षणात बदल होणार आहे. आतापर्यंत गत तीन ते चार निवडणुकीत गट आरक्षणाचा अभ्यास करून आरक्षण काढले जात असल्याने गटात कोणते आरक्षण राहील याचा अंदाज येत होता. मात्र, आता गट वाढल्याने हे राजकीय अंदाज करणे शक्य होत नाही. यामुळे गटाचे आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरक्षण निघाल्यानंतर खर्या अर्थाने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होईल.
..