नवरीचा नवरदेवाला ६ लाखांना गंडा फसवून लग्न केल्याचा आरोप पारनेर प्रतिनिधी : दि.२२ मे रोजी विवाह झालेल्या वडगांव आमली येथील नवरीने केडगांव न...
नवरीचा नवरदेवाला ६ लाखांना गंडा
फसवून लग्न केल्याचा आरोप
पारनेर प्रतिनिधी :
दि.२२ मे रोजी विवाह झालेल्या वडगांव आमली येथील नवरीने केडगांव नगर येथील सासरी तिच्या आईला बोलावून घेत लग्नातील दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८२ हजार ९७९ रूपयांचा ऐवज घेऊन जात नवरदेवाला गंडा घातल्याची घटना उघड झाली आहे.
लग्न जमविताना नवरी अश्विनी हिच्याबाबत खोटी माहीती सांगण्यात आल्याचा आरोप नवरदेव महेश (केडगांव, नगर) याने केला आहे. त्यासंदर्भात नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी नवरी अश्विनी, तिची आई सुजाता, वडील राजू, मेहुणा आकाश व भाळवणी येथील लग्न जमविणारा राजेंद्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मध्यस्ती केल्यानंतर दि. २२ मे रोजी महेश व अश्विनी यांचा विवाह झाला होता. लग्न जमविताना अश्विनी हिच्याविषयी लग्न जमविणारे, आई सुजाता, वडील राजू तसेच मेव्हणा आकाश यांनी खरी माहीती सांगितली नाही.
महेश याच्या आई वडीलांच्या संपत्तीवर डोळा ठेउन अश्विनीचा विवाह लाउन देण्यात आला. २२ मे ते १५ जुलै या कालावधीत अश्विनीने महेश यास वेळोवेळी विश्वासात घेतले. दि. १६ रोजी आईला अश्विनी हीने केडगांव येथे बोलवून घेतले. महेश घरी नसतानाच वडलांनी केलेले सोन्या चांदीचे दागिणे घेऊन अश्विनी आईसह पसार झाली. सर्व आरोपींनी संगनमताने फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचे महेश याने दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.