भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊस उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा अहमदनगर प्रतिनिधी : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारद...
भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊस
उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
अहमदनगर प्रतिनिधी :
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा, मुळा पाणलोटात काल रविवारी दुपारपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे आता भात आवणीसाठी पोषक परिस्थिती झाल्याने या कामाला वेग येणार आहे. दरम्यान, आज दोन्हीही धरणांत पाण्याची चांगली आवक होणार आहे.
पाणलोटात पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तसेच पावसाचा जोर नसल्याने दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नव्हती. पण भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारी रात्रीपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला. घाटघरला 73 मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर रविवारीही पावसाळी वातावरण टिकून होते. दुपारनंतर भंडारदरासह घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पावसाने जोर धरला. त्यामुळे नेकलेस, नामी, मनोहर, पांजरेसह अन्य लहान मोठे धबधबे पुन्हा सक्रीय झाले असून ओढेनाले खळखळू लागले असून धरणाच्या पाणीसाठ्यात सामावू लागले आहेत.
या हंगामात पहिल्यांदाच पावसाने जोर धरला आहे.रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर टिकून होता. भातखाचरांमध्ये पाणी साचू लागल्याने आवणीच्या कामाला वेग येणार आहे. तसेच धरणातील पाणीसाठाही वाढणार आहे. काल दुपारनंतर झालेल्या पावसाची नोंद 10 मिमी झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात 4648 दलघफू साठा होता. 102 दलघफू क्षमतेचे वाकी धरणही येत्या काही तासांत निम्मे होण्याची शक्यता आहे.
कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातही काल दुपारपासून कोतूळ, हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनईत पावसाचा जोर वाढला. त्यामुळे आता मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पाऊस नसल्याने भात आवणीचे काम खोळंबले होते. आता भात लागवडीच्या कामाला शेतकरी जुंपला जाणार आहे.
26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सकाळी 9806 दलघफू पाणीसाठा होता. कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 795 क्युसेक होता. त्यानंतर सायंकाळपासून पाणी पातळीत वाढ होत होती.