सुपा एमआयडीसीत पुन्हा गोडाऊन फोडले पारनेर प्रतिनिधी : सुपे औद्योगिक वसाहतीमधील बंद असलेली गोडाउन फोडून चोरी करण्याच्या घटना वाढत आहेत. शिवश...
सुपा एमआयडीसीत पुन्हा गोडाऊन फोडले
पारनेर प्रतिनिधी :
सुपे औद्योगिक वसाहतीमधील बंद असलेली गोडाउन फोडून चोरी करण्याच्या घटना वाढत आहेत. शिवशक्ती कंपनीचे बंद गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्याने मक्याच्या गोण्या चोरून नेल्या.
या संदर्भात कंपनीचे स्टेशनरी एच. आर. आकाश सुधाकर आल्हाट यांनी सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये शिवशक्ती ही कंपनी असून तेथे खाद्य तेलाची निर्मिती होते. गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी बंद आहे. हीच संधी साधून अज्ञात चोरटयाने गोडाऊन फोडून त्यातील मक्याच्या ९९ हजार रूपये किंमतीच्या ६६ गोण्या चोरून नेल्या.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी व्यवस्थापनाकडे त्यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आकाश आल्हाट यांनी सुपे पोलिसांना त्याबाबत माहीती दिली. पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल रेपाळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चोरीच्या घटनेचा पंचनामा करण्यात आल्यानंतर आकाश आल्हाट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात मालमत्ता असलेले बंद गोडाऊन फोडून त्यातील मक्याच्या गोण्यांची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल रेपाळे या पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, सुपे एम आय डी सीमध्ये बंद असलेले गोडाऊन फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. उद्योजकांनी कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही अथवा इतर उपययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये सुपे पोलिस ठाणे आहे. असे असतानाही कंपन्यांचे गोडाऊन फोडण्याचे धाडस चोरट्यांकडून करण्यात येत असल्याबददल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.