टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत राबविणार 'हर घर तिरंगा' अभियान विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रम टाकळी ढोकेश्वर सरपंच अरुणा खिलारी य...
टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत राबविणार 'हर घर तिरंगा' अभियान
विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रम
टाकळी ढोकेश्वर सरपंच अरुणा खिलारी यांची माहिती
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत दि. १३ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव राबविण्यत येणार आहे. स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण सदैव तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी जनमाणसात रहावी, या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक स्मरण करण्यासाठी या महोत्सवा अंतर्गत दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे 'घरोघरी तिरंगा ' हा उपक्रम राबविण्यात यावा, असे अवाहन टाकळी ढोकेश्वर गावच्या सरपंच अरुणा खिलारी उपसरपंच किरण उर्फ रामभाऊ तराळ यांनी केले.
दरम्यान टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत च्या वतीने अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम यावेळी राबवण्यात येणार आहे टाकळी ढोकेश्वर येथील सर्व जिल्हा परिषद शाळा, नवोदय विद्यालय व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसमवेत गावातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी सरपंच उपसरपंच यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम यावेळी राबविण्यात येणार असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत भोजन देण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच अरुणा खिलारी म्हणाल्या की स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना आपण सर्वांनी देशाप्रती अभिमान व राष्ट्रभक्ती नेहमी जागृत ठेवली पाहिजे. देश हितासाठी काम करत राहिली पाहिजे. टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आम्ही देशाचा अमृत महोत्सव वर्ष साजरे करणार आहे.