तालुक्याच्या उत्तर भागातील बस सेवा पूर्ववत करा : सुजित झावरे पाटील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पारनेर आगाराला निवेदन पारनेर प्रतिनिधी...
तालुक्याच्या उत्तर भागातील बस सेवा पूर्ववत करा : सुजित झावरे पाटील
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पारनेर आगाराला निवेदन
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्याच्या उत्तर भागातील टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सावताळ, वनकुटे, पळशी, मांडवे, पोखरी, देसवडे या परिसरातील शेकडो विद्यार्थी कॉलेज तसेच शालेय शिक्षणासाठी पारनेर शहरात येत असतात तसेच कोरोना काळामध्ये मुक्कामी येणाऱ्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या त्या अजूनही पूर्वत झालेल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सुजित झावरे पाटील यांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळ पारनेर आगार प्रमुखांना निवेदन देत तालुक्याच्या विविध गावांमधील मुक्कामी येणाऱ्या बस फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे व ही कारवाई तातडीने करावी अशी विनंती पारनेर आगाराला करण्यात आली आहे.
दरम्यान कोरोना काळातील परिस्थितीमुळे एसटी महामंडळाने तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुक्कामी येणाऱ्या बसच्या फेऱ्या बंद केल्या होत्या. परंतु कोरोनाचा उद्रेक आता शांत झालेला असतानाही राज्य परिवहन महामंडळाने अजूनही ग्रामीण भागातील व तालुक्यातील बस सेवा का पूर्वत केली नाही. असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तालुक्याच्या विविध भागातून स्थानिक पातळीवरून वेळोवेळी पारनेर आगाराला निवेदनही देण्यात येत आहेत. तालुक्यातील ज्या ठिकाणावरून मागणी होत आहे. त्या ठिकाणीच बस सेवा पूर्वत केली जात असून इतर बऱ्याच ठिकाणी बसच्या मुक्कामी फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची होणारी प्रवासाची कुचंबना लक्षात घेता भाजप नेते जिप.चे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पारनेर आगाराला हे निवेदन दिले आहे.