शहीद रामचंद्र साठे यांच्या वारसांना माध्यमिक शिक्षक सोसायटीचा मदतीचा हात राहुरी/प्रतिनिधी : (शेख युनुस) आपल्या देशाच्या सीमेवर ज...
शहीद रामचंद्र साठे यांच्या वारसांना माध्यमिक शिक्षक सोसायटीचा मदतीचा हात
राहुरी/प्रतिनिधी : (शेख युनुस)
आपल्या देशाच्या सीमेवर जवान डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करतात म्हणून आपण देशात सुखात व सुरक्षित राहतो. मात्र हाच जवान देशासाठी शहीद झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आपलाही मदतीचा हातभार लागला पाहिजे या उदात्त हेतूने अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीकडून जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना ५१ हजार रुपयांची मदत केली जाते. अशीच मदत पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील शहिद जवान रामचंद्र लहु साठे यांच्या कुटुंबीयांना करण्यात आली.
एक महिन्यापूर्वी पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील मेजर रामचंद्र लहू साठे यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावताना वीरगती प्राप्त झाली होती. म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने त्यांच्या वारसांना ५१ हजार रुपयांचा धनादेश नुकताच त्यांच्या घरी लोणी हवेली येथे सन्मानपूर्वक देण्यात आला. शहीद जवान रामचंद्र साठे यांच्या पत्नी कल्याणी साठे, वडील लहू साठे तसेच किसन साठे, रावसाहेब साठे यांनी त्याचा स्वीकार केला.
यावेळी शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, चेअरमन अशोकराव ठुबे, संचालक सत्यवान थोरे, लोणेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दुधाडे सर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी थोरे, संभाजी थोरे, अशोक कोल्हे, बाजीराव दुधाडे, श्री कोल्हे सर, जासूद सर आदी यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी हि जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची महत्त्वाची सहकारी संस्था आहे. संस्थेचा कारभार हा सभासद केंद्रबिंदू मानून चालू आहे. त्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. शहिद जवानांच्या वारसांना ५१ हजार रुपयांची मदत करणे हा एक समाजाभिमुख उपक्रम मागील तीन वर्षांपासून सतत सुरू आहे.
भाऊसाहेब कचरे
ज्येष्ठ संचालक