पिंपरी जलसेनच्या सरपंच, उपसरपंच बदलाच्या हालचालींना वेग ६ सदस्यांना मिळणार पदे.... पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्...
पिंपरी जलसेनच्या सरपंच, उपसरपंच बदलाच्या हालचालींना वेग
६ सदस्यांना मिळणार पदे....
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिंपरी जलसेनच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच बदलाच्या हालचालींना वेग आला असून इच्छुक भावी सरपंच, उपसरपंच यांच्याकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी जलसेन ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२० रोजी पार पडली. त्यावेळी रोकडेश्वर महाविकास आघाडीला बहुमत मिळाले होते. यावेळी विरोधी गटाला तीन व सध्या सत्तेत असलेल्या गटाला ६ जागा मिळाल्या होत्या. सरपंच निवडीवेळी सर्व सदस्यांना सत्तेत पदे देण्याचे ठरवले होते.
त्यानुसार पहिल्या दीड वर्षात सरपंच म्हणून सुरेश काळे तर उपसरपंच म्हणून वर्षा पानमंद यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला दीड वर्ष पूर्ण झाले असून त्यांचा कार्यकाळ संपला आहे. आता ठरल्याप्रमाणे इतर सदस्यांना संधी मिळण्यासाठी तत्कालीन सरपंच, उपसरपंच यांनी राजीनामा देऊन इतरांना संधी द्यावी अशी चर्चा आता पारावर रंगू लागली आहे. ज्यांचा पुढील टर्मसाठी नंबर आहे ते इच्छुक कामाला लागले आहेत. तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांनी राजीनामा दिला तरच इतरांना संधी मिळणार आहे. त्यामुळे हे राजीनामा देतात की नाही याकडे पिंपरी जलसेनकरांचे लक्ष लागले आहे.
६ सदस्यांना मिळणार पदे....
निवडणुकीत ९ पैकी ६ सदस्य निवडून आणत रोकडेश्वर महाविकास आघाडी पॅनल ने सत्तेच्या चाव्या खेचून आणल्या होत्या. निवडणुकीच्या विजयानंतर पाच वर्षांमध्ये ६ सदस्यांना पदे देण्याचे ठरले होते. त्यानुसार पहिल्या टर्ममध्ये दोघांना दीड वर्षांसाठी सरपंच, उपसरपंच, दुसऱ्या टर्म मध्ये दुसऱ्या दोघांना दीड वर्ष सरपंच, उपसरपंच, व उर्वरित दोघांना उरलेल्या २ वर्षामध्ये सरपंच उपसरपंच पद देण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले असल्याचे बोलले जात आहे.
COMMENTS