धरण भरल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पारनेरसाठी जीवनदायीनी ठरणारे मांडओहोळ पूर्णक्षमतेने भरले गाळ वाहून नेल्या...
धरण भरल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
पारनेरसाठी जीवनदायीनी ठरणारे मांडओहोळ पूर्णक्षमतेने भरले
गाळ वाहून नेल्याने खोली वाढण्यासोबतच साठवण क्षमतेतही वाढ
पारनेर/प्रतिनिधी :
पाणी टंचाईच्या काळात तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरणारा मांडओहोळ मध्यम प्रकल्प शनिवारी रात्री पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. अपुऱ्या पावसामुळे गेल्या वर्षी धरण भरले नव्हते. यावर्षी धरण भरल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मांड ओहोळ प्रकल्पची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. ३० सप्टेंबर रोजी पळसपूर, नांदूरपठार, सावरगाव परिसरासह मांड ओहोळ प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे.
सातत्याने पाऊस झाल्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता तो खरा ठरला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाणी टंचाईच्या काळात प्रत्येक
वर्षी साधारण एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मांडओहळ धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. या काळात तालुक्यातील बहुतांशी गावांच्या पाणी योजनांचे उदभव कोरडे पडतात. त्यामुळे मांडओहळ धरणातून तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी टंचाईच्या काळात मांडओहोळ धरण तालुकावासियांसाठी जीवनदायिनी ठरते.
चार वर्षांपूर्वी, २०१८ साली मांड ओहोळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने धरणात
नवीन पाण्याची आवक झाली नव्हतो. एप्रिल २०१९ सर्व पाणी संपल्याने धरण कोरडे पडले होते. त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी घरणातील साचलेला गाळ वाहून नेला. त्यामुळे धरणाची खोली वाढण्या बरोबरच साठवण क्षमतेतही वाढ झाली आहे.
पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक
धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर, धरण परिसराबरोबरच जवळच असलेला रुईचोदा धबधबा, नगरसह पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो. पावसाला सुरूवात झाल्यापासून या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र धरणापासून दीड किमी अंतरावर दरीत असणारा रुईचोंढा धवधवा हुल्लडबाज पर्यटकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी या धबधब्यात बुडाल्याने पाच पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.