वेब टीम : बुलडाणा राज्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे खूपच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. ४० बंडखोरांना अस्म...
वेब टीम : बुलडाणा
राज्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे खूपच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. ४० बंडखोरांना अस्मान दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी डावपेच सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून यवतमाळमध्ये भाजपसह शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
येत्या २० ऑक्टोबर रोजी भाजपचे नेते आणि माजी आमदार संजय देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांना धक्का देण्याची रणनीती सुरू आहे.
यासाठी ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे तीन वेळेस आमदार असलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) हे पुन्हा शिवबंधन बांधणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार गायकवाड अडचणीत येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या मतदार संघात तीन वेळा आमदार राहिलेल्या विजयराज शिंदे यांच्याकडून आव्हान देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखल्या जात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात होत आहे.
विजयराज शिंदे आणि संजय गायकवाड यांच्यामध्ये मध्यंतरी मोठा वाद झाला होता. शिंदे ठाकरे गटात दाखल झाल्यास गायकवाड यांची डोकेदुखी वाढू शकते.
विजयराज शिंदे कधी शिवबंधन बांधतील याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, ”ही लोकशाही आहे… मी १५ वर्षांत शिवसेनेचा आमदार म्हणून केलेल्या कामाची कुणी दखल घेत असेल तर वावगं काय आहे ?
मात्र, अद्याप तरी उद्धव ठाकरे गटाच्या कुठल्याच मोठ्या नेत्याने माझ्याशी संपर्क केलेला नाही.” मात्र, बुलढाण्यात आता बंडखोर आमदार गायकवाड यांना शह देण्यासाठी हालचालींना वेग आल्याचे चित्र राजकीय वर्तुळात आहे.