वेब टीम : पुणे पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नगर, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना...
वेब टीम : पुणे
पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नगर, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा आणि अकोला येथे विजांसह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या चार दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.
अनेक ओढे-नाले वाहत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले; तर शेतात साचलेल्या पाण्यामुळे हाताला आलेली पिके खराब होत आहेत.
केरळ ते नैर्ऋत्य मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा कर्नाटक, मराठवाडा आणि विदर्भातून गेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे.
पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील घाटमाथा, तसेच धरण क्षेत्रातही पावसाची व्याप्ती वाढली आहे.
विदर्भ मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा जोर अधिक आहे. परतीच्या पावसामुळे विदर्भातील कापूस, मराठवाड्यातील उडीद आणि सोयाबीन, मध्य महाराष्ट्र व खानदेशातील कांदा व द्राक्षाच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कापूस भिजून खराब होत आहे.
उदीड आणि सोयाबीन खराब होत असून खराब वातावरणामुळे वखारीतील कांदा नासत आहे. द्राक्षाच्या पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसत आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीलगतच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
राज्यभरात ढगाळ वातावरण आहे. पावसामुळे कमाल आणि किमान तपमानात मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
विदर्भात बर्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. खानदेश, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. सर्वत्र चिखल आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी झाडे कोसळत आहेत. त्यामुळे पावसात घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी.
पावसात वेगाने वाहन चालवू नये. नदी, धरणाच्या शेजारी थांबू नका, झाडांखाली तसेच डोंगराच्या शेजारी थांबणे टाळा. सखल भागात पाणी साचले असल्याने पाण्यातून जाताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.