मुंबई: सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ऑगस्ट महिन्यात संजय राऊत यांना अटक केली होती. तेव्हापा...
मुंबई:
सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ऑगस्ट महिन्यात संजय राऊत यांना अटक केली होती. तेव्हापासून संजय राऊत हे तुरुंगात होते.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून गेल्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊत यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. शिवसेनेचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम संजय राऊत हे चोखपणे पार पाडत होते. संजय राऊत भाजपविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची भूमिका लोकांना पटवून देण्याचे काम करत होते. 
मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत काही काळातच तुरुंगात गेल्याने ठाकरे गटाकडे प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडणार प्रभावी वक्ता उरला नव्हता. मात्र, आता संजय राऊत पुन्हा तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा एकदा नव्या जोमाने भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडताना दिसतील. 
राऊत 100 दिवसांपासुन कोठडीत होते. जामीन मंजूर झाला असला तरी संजय राऊत नेमके कधी बाहेर येणार हे दुपारी ठरणार आहे. कारण ईडीने जामीनावर आक्षेप घेतला आहे. 
त्यावर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊत आज जेलमधून बाहेर येणार की त्यांचा मुक्काम आणखी वाढणार हे त्यानंतर स्पष्ट होणार आहे.
 
 
   
							     
							     
							     
							     
 
 
 
 
