वेब टीम : पुणे अल्सरचे पोटाचा आणि अन्ननलिकेचा असे दोन प्रकार आढळतात. या दोन्ही अल्सरची कारणं वेगवेगळी असतात. अन्ननलिकेचा अल्सर अत्यंत दुर्म...
वेब टीम : पुणे
अल्सरचे पोटाचा आणि अन्ननलिकेचा असे दोन प्रकार आढळतात. या दोन्ही अल्सरची कारणं वेगवेगळी असतात. अन्ननलिकेचा अल्सर अत्यंत दुर्मिळ असतो. मद्यपान हे यामागचं महत्त्वाचं कारण असतं. पोटाच्या अल्सरमागे धूम्रपान, विविध प्रकारच्या औषधांचं सेवन यासह काही अनुवांशिक कारणं असू शकतात.
कुठे होतो अल्सर? पोटाचा आतला थर किंवा छोट्या आतड्यामध्ये अल्सर विकसित होतो. पाचक रसांपासून पोटाचं रक्षण करणार्या चिकट पदार्थाच्या थराचं प्रमाण कमी झालं की अल्सर विकसित होण्यास सुरूवात होते. चिकट पदार्थाचा थर कमी झाला की पोटातून स्रवणारी पाचक आम्ल आतील भागाच्या आवरणाचे टिश्यू नष्ट करतात. यामुळे अल्सर विकसित होऊ लागतो.
अल्सर होण्याची कारणं – ‘हेलिकोबॅक्टर पिलोरी’ नावाचा बॅक्टेरिया पोटाच्या अल्सरला कारणीभूत ठरू शकतो. या बॅक्टेरियामुळे पोटाच्या आतल्या भागात दाह निर्माण होतो. बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. चुंबन, अन्नाचं किंवा पाण्याचं सेवन याद्वारे बॅक्टेरिया शरीरात शिरकाव करतो. * दाह किंवा वेदना कमी करणार्या औषधांचं नियमित सेवन हे देखील पोटाच्या अल्सरमागील प्रमुख कारण आहे. नियमितपणे वेदनाशामकं घेणार्या ज्येष्ठांना हा विकार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. * स्टेरॉइड्स, ऍस्पिरिनसारख्या औषधांमुळे अल्सर होऊ शकतो.
अल्सरची लक्षणं-अल्सरमुळे रूग्णाला तीव्र स्वरूपाच्या वेदना सहन कराव्या लागतात. ओटीपोटाच्या वरच्या भागात जळजळ, वेदना जाणवणं, वेदना थांबवण्यासाठी आम्लनाशक औषधांच्या सेवनाची गरज भासणं, खाल्ल्यानंतर पोटात वेदना जाणवणं ही याची लक्षणं आहेत. अल्सर कुठे विकसित झाला, यावरून वेदनांची वेळ ठरते. उदाहरणार्थ खाल्ल्यानंतर लगेच पोट दुखायला लागलं तर गॅस्ट्रिक अल्सर असू शकतो. खाल्ल्यानंतर दोन ते तीन तासांनी वेदना जाणवू लागल्या तर पक्वाशयाचा अल्सर असू शकतो. सतत ढेकर, पोटात गोळे येणं, पोट जड वाटणं, मळमळणं या लक्षणांवरुनही ही समस्या ओळखता येते.
अल्सरवरील उपाय : पोटाचा त्रास जाणवत असेल तर सर्वप्रथम तिखट, आंबट पदार्थ बंद करा. नियमित व्यायाम, योगासनं, ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, मद्यपानाचं प्रमाण कमी करणं, पोटाचा जंतूसंसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणं, खाण्याआधी हात स्वच्छ धुणं, अन्न नीट शिजवून खाणं, भाज्या स्वच्छ धुवून घेणं, धूम्रपान सोडणं आदी प्रतिबंधात्मक उपाय करता येतील.