अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याव...
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणातील भीम सैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यातील चुकीचे कलम कमी करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले. यावेळी बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, विधानसभा प्रभारी संजय डहाणे, शहर उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटोळे, शहर सचिव राजू गुजर, आकाश जंनजाळ, शहर उपाध्यक्ष राजू भिंगारदिवे, वैभव जाधव, अजय नेटके, अभिजीत भालेराव, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमान जनक वक्तव्याने बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पाटील यांनी तात्काळ बहुजन समाजाची माफी मागून नैतिकतेच्या आधारे मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर व कर्मवीरांच्या त्याग व पुरोगामी विचारामुळे सुशिक्षित आणि पुढारला आहे. बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची तुलना होऊ शकत नाही. केवळ वैचारिक अज्ञान व डोक्यात बहुजनाबद्दल असलेल्या तिरस्कारमुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.
महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यानंतर पिंपरी चिंचवड येथे मनोज गरबडे, धनंजय इजगज, विजय ओव्हळ यांच्याविरुद्ध शाही फेकली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न असा गंभीर व चुकीचा कलम लावण्यात आलेला आहे. या घटनेचे चित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांना देखील शाईफेक प्रकरणा सामील असल्याचा आरोप करून त्यांना पोलिसांद्वारे त्रास देण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न या घटनेतून झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शाईफेक करणार्या भीम सैनिकांवर लावण्यात आलेले चुकीचे कलम कमी करावे, चंद्रकांत पाटील यांच्या मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा व अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे.
COMMENTS