वेब टीम : अहमदनगर भ्रष्टाचार रोखण्यासाठी 16 ऑगस्ट 2011 रोजी दिल्लीतील रामलिला मैदानावर मोठे आंदोलन झाले. त्यामुळे 1 जानेवारी 201...
वेब टीम : अहमदनगर
भ्रष्टाचार रोखण्यासाठी 16 ऑगस्ट 2011 रोजी दिल्लीतील रामलिला मैदानावर मोठे आंदोलन झाले. त्यामुळे 1 जानेवारी 2014 रोजी लोकपाल कायदा झाला. राज्यातील नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार करता यावी, यासाठी राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा असणे महत्त्वाचे होते. म्हणून आम्ही गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत होतो, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.
30 जानेवारी 2019 ला या विषयावर राज्यातील भाजप-सेना सरकारच्या विरोधात राळेगणसिद्धी येथे उपोषण झाले. राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी तालुका, जिल्हास्तरावर आंदोलन करून यात सहभाग घेतला. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मसुदा समिती नेमण्यात आली होती.
यासमितीने साडेतीन वर्ष यावर काम करून एक सुंदर मसुदा तयार केलेला आहे. आता चालू हिवाळी अधिवेशनात हे विधेयक ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. त्याबद्दल मी जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो.
लोकायुक्त कायद्याचा मसुद्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून येत्या हिवाळी अधिवेशनात हा मसुदा मांडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबद्दल शासनाचे आभार मानत 2011 मध्ये दिल्ली येथील रामलिला मैदानावर झालेल्या प्रदीर्घ जनआंदोलनाचे हे फळ असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.