वेब टीम : दिल्ली सत्तासंघर्षाच्या घटनाक्रमात एकनाथ शिंदे (Eknath Shnde) यांची बहुमत चाचणी अवैध असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून वारंवार करण्...
वेब टीम : दिल्ली
सत्तासंघर्षाच्या घटनाक्रमात एकनाथ शिंदे (Eknath Shnde) यांची बहुमत चाचणी अवैध असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र याच वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेला राजीनामा हादेखील या घटनाक्रमात महत्त्वाचा मुद्दा ठरला जात आहे.
सुप्रीम कोर्टानेही याच मुद्द्यावरून आज निरीक्षण नोंदवत मोठे भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याच वेळी अधिकार गमावला. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता आणि ३९ आमदारांमुळे हरला असता तरीही आम्ही बहुमत चाचणी रद्द केली असती, असे विधान सरन्यायाधीशांनी केले.
मात्र जे झाले ते आम्ही बदलू शकत नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Manu Singhvi) यांनी केले. एकूणच सत्तासंघर्षाच्या एकूण घटनाक्रमात उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ही मोठी चूक होती, यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
सुप्रीम कोर्टात आज राज्यपालांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात आला. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, राज्यपालांनी घटना पायदळी तुडवली.
या घटनाक्रमातील घटना पुन्हा जैसे थे करता येऊ शकतात, अशी शक्यता ठाकरे गटाच्या वकिलांकडून कोर्टात व्यक्त करण्यात आली. यासाठी दिल्लीतील उंच टॉवर पाडल्याचा दाखलाही देण्यात आला.
ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावरही भाष्य केलं. अध्यक्षांनी नोटीस दिल्यानंतर किती वेळात निर्णय घ्यावा, हेदेखील या प्रकरणातच ठरले पाहिजे. जेणेकरून भविष्यात अशी प्रकरणं घडल्यास ही सुनावणी उपयुक्त ठरेल.