अहमदनगर, दिनांक ९ मे २०२३ स्नेहालय संचलीत केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहदीप रुग्णसेव...
अहमदनगर, दिनांक ९ मे २०२३
स्नेहालय संचलीत केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र हा उपक्रम सुरू झाला आहे. नुकतेच या स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघ सावेडी चे पदाधिकारी-अध्यक्ष आदिनाथ जोशी, ज्योत्सना केसकर, उपाध्यक्ष शिवप्रसाद जोशी, ज्येष्ठ नागरिक मंच भिंगारचे विठ्ठलराव लोखंडे, पोपटराव नगरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
स्नेहालय संस्थेचे पालक भरत कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, भारतात विविध कारणांनी परावलंबित्व आलेल्या सर्व प्रकारच्या रूग्णांची संख्या आजमितीस सुमारे १२ कोटी आहे. सध्या भारत हा जगातील सर्वात तरूण देश आहे. पण पुढील २ दशकात भारत हा वृद्धांचा देश बनत जाईल. विविध आजार आणि अकाली संसर्गजन्य साथी, अपघातांची वाढती संख्या, विघटित कुटुंब पद्धती-घरांचा लहान होत चाललेला आकार- कुटुंबातील सेवा-सुश्रुषा याची जाण असणाऱ्या व्यक्तींचा अभाव, यांमुळे स्नेहदीप सारखे रूग्णसेवा केंद्र, ही भारताची वाढती सामाजिक गरज बनली आहे. यासंदर्भात श्रीमंतांसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. तथापि मध्यम वर्ग आणि त्याखालील स्तरातील गरजु परावलंबितांसाठी पर्याय हवा होता. 'ना नफा ना तोटा' तत्वावर, रास्त दरात सेवा सुश्रुषा देणाऱ्या स्नेहदीप केंद्राच्या निर्मितीची ही पार्श्वभुमी आहे. स्नेहदीप देत असलेल्या सेवांसाठी इतरत्र अवाजवी शुल्क घेतले जाते. त्यामुळेच स्नेहालय आणि स्वामी विवेकानंद विद्या प्रतिष्ठानच्या या कार्यकर्त्यांनी हे केंद्र सुरू करण्यात पुढाकार घेतला. योग्य दरात दर्जेदार सेवा देणे, हा आमचा उद्देश आहे. देशात सर्वत्र अशा प्रकारची केंद्र निर्माण करण्याच्या चळवळीला चालना देण्यासाठी जनजागृती आणि ईच्छुक सेवाव्रतींचे प्रशिक्षण भविष्यात येथे केले जाणार आहे. वृद्धाश्रम, हॉस्पिटल, घर यांचा सुवर्णमध्य हा उपक्रम साधतो.
परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा-सुश्रुषा देणारा हा उपक्रम असल्याचे ज्येष्ठ नागरिक मंच सावेडीचे अध्यक्ष आदिनाथ जोशी काका यांनी आपल्या शुभेच्छा पूर्वक अध्यक्षीय भाषणात म्हटले. ते पुढे म्हणाले कि, सर्व वयोगट जाती-धर्म-लिंगाच्या व्यक्तींना आजारपण अपघात-शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातुन, उद्भवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारांतुन बरे होताना आवश्यक परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरविणारा स्नेहदीप रुग्णसेवा केंद्राची अहमदनगर सारख्या शहरात अत्यंत आवश्यकता होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक मंच सावेडी व भिंगार चे शिवप्रसाद जोशी विठ्ठलराव लोखंडे पोपटराव नगरे सौ वैशाली जोशी तसेच मोठया संख्येने ज्येष्ठ नागरिक सदस्य उपस्थित होते.
उद्घाटनाचे औचीत्यासाधत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे मोफत डोळे, दंत, कान, नाक, घसा, त्याचप्रमाणे शुगर, बीपी तपासणी- डॉ. अतुल मडावी (दंतरोग तज्ञ), डॉ. अर्चना लांडे, डॉ. दिपक सुरवसे, शीला शिंगण, पल्लवी वाघमारे व वैशाली पांढुरे आदींनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी अजिंक्य भिंगारदिवे, आऊटरीच वर्कर अनिकेत धायटे, अनिकेत रणमाळी, शंकर थापा व मनीषा वाखूरे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रकल्पाचे संचालक हनिफ शेख यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता पूरनाळे यांनी केले.