नगर - अहमदनगर भिंगार कॅन्टोमेंट बोर्ड हे सध्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत असून, त्याचा अहमदनगर महानगरपालिकेत समावेश व्हावा, याबाबत...
नगर - अहमदनगर भिंगार कॅन्टोमेंट बोर्ड हे सध्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत असून, त्याचा अहमदनगर महानगरपालिकेत समावेश व्हावा, याबाबत केंद्र शासनाने राज्य सरकारला ऑगस्ट 2022 मध्ये सुचविले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरु झालेले समजते. परंतु आज वर्ष होत आले तरी अजून त्याबाबत कोणत्याच हालचाली सुरु असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कॅन्टोमेंट बोर्डची निवडणुकही झालेली नाही. बोर्डात लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत. तेव्हा कॅन्टोमेंट बोर्डाचा अहमदनगर महानगरपालिकेत कधी समावेश होणार असा सवाल नागरिकांसह भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
कॅन्टोमेंट बोर्डाच्या लोकप्रतिनिधींची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपली असून, सध्या प्रशासक कामकाज करत आहेत. काही दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर झाली होती, परंतु प्रशासनाने तीही रद्द केली. त्यानंतर केंद्र शासनाच्या पत्रकानुसार देशातील अनेक कॅन्टोमेंट बोर्डांचा जवळच्या महानगरपालिका, नगरपालिकेत समावेश करण्यात यावा, असे राज्य सरकारला कळविले होते. त्यादृष्टीने प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली परंतु आजपर्यंत काहीही झालेले दिसत नाही.
जर कॅन्टोमेंट बोर्डाचा मनपात समावेश झाल्यास तेथील कचरा, पाणी, चटई क्षेत्र, स्ट्रीट लाईट, रस्ते, शौचालय, कर्मचार्यांचे थकित वेतन आदि प्रश्न दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच कॅन्टोमेंट बोर्ड हद्दीत अनेक ओपन स्पेस आहेत, तेही विकसित होतील. मनपास मोठा निधी उपलब्ध होत असल्याने त्या माध्यमातून भिंगार कॅन्टोमेंट बोर्ड परिसराचा कायापालट होण्यासाठी मनपात समावेश होणे गरजेचे आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे लोकप्रतिनिधी मिळाल्यास त्यांच्या माध्यमातूनही प्रत्येक परिसराचा विकास होईल.
वरील सर्व गोष्टींचा विचार करुन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी यात स्वत: लक्ष घालून केंद्र व राज्य पातळीवरील याबाबतच्या अडचणी सोडवाव्यात व भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाचा मनपात समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन सागर चाबुकस्वार यांनी केले आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब भिंगारदिवे, संतोष धिवर, संदिप गजभिव, अच्चुत गाडे, कैलास वाघस्कर आदिंनीही पाठिंबा दर्शविला आहे.
COMMENTS