नगर : ग्रामसेवकांनी आपल्या कामांमध्ये विठ्ठल पहावा. कामात विठ्ठल शोधला की आपोआप गावचा विकास होतो. ग्रामसेवकांपुढे काम करताना गाव...
नगर : ग्रामसेवकांनी आपल्या कामांमध्ये विठ्ठल पहावा. कामात विठ्ठल शोधला की आपोआप गावचा विकास होतो. ग्रामसेवकांपुढे काम करताना गावामध्ये खूप आव्हानं असतात. सर्वांचे सहकार्य लागते. पण एक सरकारी नोकर म्हणून सांगू शकत नाही सहकार्य लाभत नाही म्हणून. आपल्याला त्यावर मात करून आपल्या कामाचा ठसा गावात उमटावायचा असतो. एकनाथ ढाकणे यांनी ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचा अतिशय आदर्शवत उपक्रम सुरू केला आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या संकल्पनेतून ग्रामसेवकांची नगर ते पंढरपूर अशी पायी प्रबोधन दिंडी शनिवारी नगर शहरातून मार्गस्थ झाली. या दिंडीच्या शुभारंभप्रसंगी आ .किरण लहामटे बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,उपमुख्य कार्यकारी राहुल शेळके, जिल्हा अध्यक्ष एकनाथ ढाकणे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले की, ग्रामीण भागासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्या योजनांची प्रत्यक्ष गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात ग्रामसेवक महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असताना नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक 6 वर्षांपासून आषाढी वारीनिमित्त नगर ते पंढरपूर अशी प्रबोधन दिंडी काढत आहेत. या दिंडीतून ते शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवतानाच त्याला अध्यात्माचे अनुष्ठानही देणार आहे. या मार्गात वृक्षारोपण करण्याबरोबरच सामाजिक संदेशही देण्यात येणार आहेत. यातून प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यातील सुसंवाद आणखी व्यापक होण्यास मदत होईल.
प्रबोधन दिंडीबाबत बोलताना एकनाथ ढाकणे म्हणाले की, ग्रामसेवकांना आपले काम करताना अनेक ताणतणावांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या आषाढी वारीच्या परंपरेत प्रत्येकाला तणावमुक्त करण्याची ताकद आहे. याची अनुभूती मागील यापूर्वी या दिंडीत सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना आली. दिंडी आयोजित करताना समाज प्रबोधनही करण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी किर्तन, दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, सेवा हमी कायदा, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, स्वच्छता अभियान, नरेगा योजना, शौचालय वापर, निर्मल ग्राम, अंधश्रध्दा निर्मूलन, व्याख्याने, भारूड, लघुपटाच्या माध्यमातून गावोगावी प्रबोधन केले जाणार आहे. पायी दिंडीदरम्यान थेट पंढरपूरपर्यंतच्या वाटेवर ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे काम ग्रामसेवक करणार आहेत. पंढरपूरला पोहचल्यावर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम करण्याचे साकडे पांडुरंगाच्या चरणी घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दि.21 जूनपर्यंत ग्रामसेवक प्रबोधन दिंडी सोहळा चालणार असून पंढरपूरजवळ राज्यातील ग्रामसेवक या दिंडीत सहभागी होणार आहेत. पांढरी शुभ्र वेशभूषा, डोक्यावर टोपी, टाळमृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनाम अशा प्रसन्नचित्त वातावरणात सर्व ग्रामसेवक अतिशय शिस्तबध्दरित्या दिंडीत सहभागी झाले आहेत. या दिंडी सोेहळ्यात पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब आमरे,व्हा.चेअरमन रामदास गोरे,अशोक नरसाळे, सुनिल नागरे, शितल पेरणे-खाडे, शहाजी नरसाळे, लक्ष्मण नांगरे, राजेंद्र पावसे, संजय घुगे, युवराज पाटील, सुभाष गर्जे, रामदास दुबे, रामेश्वर जाधव, आसाराम कपिले, रमेश त्रिंबके, कृष्णा बडे, भैयासाहेब कोठुळे, सचिन वीर, रामकिसन बटुळे, शिवाजी पालवे, उध्दव जाधोर, बाळासाहेब नजन, संभाजी दौंड, रमेश बांगर, मंगेश पुंड, विठ्ठल आव्हाड, वालिबा मुंढे, विलास काकडे, धनाजी फडतारे, रांधवने दादा, गोरक्षनाथ शेळके, संपत गोल्हार, नफीसखान पठाण, प्रदीप कल्याणकर, संतोष खाडे आदींसह 100 हून अधिक ग्रामसेवक सहभागी झाले आहेत.