कोण होणार भाजपचा प्रदेशाध्यक्ष : महाजन, पंकजा मुंडेंचे नाव आघाडीवर


DNALive24 : मुंबई
भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिल्याने आता त्यांच्या जागेवर दुसऱ्या नेत्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत कुजबुज सुरु झाली आहे. यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे.

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच भाजप ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे पक्षसंघटनेची ताकद त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी करू शकेल आणि मुख्यमंत्र्यांशी समन्वय राखून काम करेल, अशा व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली जाऊ शकते.

नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत आली आहेत.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यावर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या जागेवर प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. अशावेळी प्रदेशाध्यक्षपद मिळावे यासाठी भाजपचे बरेच नेते इच्छुक आहेत. दानवे मराठा समाजाचे आहेत. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष नेमताना पुन्हा मराठा चेहराच दिला जाईल की, पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन वंजारी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न होईल याबाबत उत्सुकता वाढली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post