अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य आणि औदार्याचे प्रतीक : ना. पंकजा मुंडे


DNALive24 : अहमदनगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य आणि औदार्याच्या मूर्तीमंत प्रतिक आहे. त्यांनी निर्माण केलेल्या वाटेवरुन चालणे आणि समाजाभिमुख काम करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 294 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड) येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख हे होते. खासदार छत्रपती संभाजीराजे, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा राम शिंदे, खा. विकास महात्मे,माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सर्वश्री भीमराव धोंडे, अनिल गोटे, सुरेश धस, शिवाजीराव कर्डीले, रामराव वडकुते, रामहरी रुपनवर, नारायण पाटील, आमदार मोनिका राजळे यांच्यासह गोपीचंद पडळकर, पोपटराव पवार, आनंदकुमार पाटील, विजयराव मोरे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, रमेश शेंडगे, प्रकाश शेंडगे, नानाभाऊ कोकरे यावेळी उपस्थित होते

यावेळी पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, अहिल्यादेवींनी सर्व जातीधर्माना घेऊन काम केले. दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणून ठिकठिकाणी बारवा बांधल्या. सर्व समाजासाठी धर्मशाळा उभ्या केल्या. त्यांचा आदर्श पुढे चालू ठेवण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील गावागावात अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या सभागृहांसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद ग्रामविकास विभागाने केल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, दोनशेहून अधिक वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकरांनी केलेले कार्य महत्वाचे आहे. त्यांची दूरदृष्टी होती. छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती संभाजीमहाराज, छत्रपती शाहू महाराज यांनीही सर्वसमावेशक असे काम केले. या महापुरुषांच्या या विचारांची आज गरज असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी स्वागतपर प्रास्ताविकात या जयंती आयोजनामागील भूमिका सांगितली. अहिल्यादेवींचे विचार हे सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा सांगताना हा जयंती कार्यक्रमही सर्वसमावेशक असाच आहे. सर्व विचारांची माणसे, संघटना केवळ अहिल्यादेवींचा विचार पुढे नेण्यासाठी येथे आवजून येतात, ही मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वसा आणि वारसा जपण्याचे काम आपल्याला करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार गणपतराव देशमुख यांनी, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या मागास असलेल्या धनगर समाजोन्नतीसाठी सर्वांनी झटण्याची गरज व्यक्त केली. श्री. पडळकर यांनी धनगर समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी एकत्र येऊन मागण्यांचा पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी अण्णा डांगे, खा, महात्मे, श्री. पाचपुते आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.

नुकतेच युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्नेहल धायगुडे यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागातून धनगर समाजबांधव व इतर नागरिक मोठ्या संख्येने चोंडी येथे आले होते. कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांनी व नागरिकांनी यावेळी येथील शिल्पसृष्टीलाही भेट दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post