राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी


मुंबई : 
राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये, चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृहे सुरू करण्याचे निर्देश देखील पाटील यांनी यावेळी दिले.

मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यावेळी पाटील यावेळी बोलत होते. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पदुम मंत्री महादेव जानकर, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विविध विभागांचे अपर मुख्य, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.


दरम्यान, यासंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले की, राज्यात सध्या ६ हजार २०९ टॅंकर्सच्या माध्यमातून ४ हजार ९२० गावे आणि १० हजार ५०६ पाड्यांवर पाणी पुरवठा केला जात आहे. राज्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद विभागात एकूण १ हजार ५०१ चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे १० लाख ४ हजार ६८४ जनावरे आहेत. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना १११ कोटी, पुणे चार आणि नाशिक विभागीय आयुक्तांना ४७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post