बीडमध्ये जागरण-गोंधळ कार्यक्रमामध्ये 74 जणांना विषबाधा


वेब टीम : बीड
जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेल्या मांसाहारी जेवणातून 74 जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री बीड शहरात घडली. सर्वांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
बीड शहरातील धानोरा रोड परिसरात असलेले बाबासाहेब गोकुळे यांच्या घरी मंगळवारी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मांसाहारी जेवणाचा बेत त्यांनी ठेवला होता. मोठ्या प्रमाणावर नातेवाइक व मित्रपरिवाराला जेवणासाठी निमंत्रित केले होते. सुमारे दीडशे ते दोनशे लोक जेवतील असे नियोजन होते. वेळेत जेवणाचा कार्यक्रम करून नंतर वाघ्या-मुरळीच्या गाण्यांचा कार्यक्रम असे नियोजन असल्याने सकाळपासूनच स्वयंपाकाची तयारी होती. मांसाहारी भाजी, बटाटा भाजी, बाजरीच्या भाकरी असा स्वयंपाक दुपारी 12 वाजेपर्यंत तयार करून ठेवण्यात आला होता. धार्मिक कार्यक्रमानंतर जेवण होण्यास रात्रीचे नऊ वाजले. जेवलेल्या सर्वच लोकांना काही वेळातच मळमळ, उलटी, चक्कर, अतिसार असा त्रास होऊ लागला. काही वेळातच ही संख्या वाढून तब्बल 74 जणांवर गेली. यामध्ये महिला, पुरुष व लहान मुलांचाही समावेश होता. तातडीने सर्वांना एकामागोमाग एक असे जिल्हा रुग्णालयात मिळेल त्या वाहनातून दाखल करण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने विषबाधेचे रुग्ण आल्याने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनीही रात्री 11 वाजता रुग्णालयात धाव घेत पाहणी केली. अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांनाही याची माहिती दिली गेली. मध्यरात्री अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी रुग्णालयात भेट दिली. रुग्णांचे जबाब घेतले. जेवणाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवले.
विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये यांचा समावेश
वॉर्ड क्रमांक सहामध्ये भाऊराव पोटे, भाऊराव कोटुळे, संतोष खंडागळे, श्रीराम वराट, बळीराम वराट, अनिकेत कवडे, आसाराम जाधव, इंद्रजीत आगलावे, गणेश तुपे, विठ्ठल शेळके, कृष्णा मस्के यांच्यासह एकूण 36 जण, तर वॉर्ड क्रमांक आठमध्ये राधा जाधव, क्रांती गायकवाड, सुवर्णा शिंदे, रेणुका सूर्यवंशी, प्रीती आजबे, शिवकन्या कदम यांच्यासह 23 महिला, वॉर्ड क्रमांक नऊमध्ये अक्षरा वाघमारे, राजवीर लोंढे, संकेत पितळे, प्रवीण सोळंके यांच्यासह एकूण 15 बालकांना दाखल करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post