विधानसभेला राज्यात युतीचा ऐतिहासिक विजय होणार : विखे पाटलांचा दावा


वेब न्यूज : अहमदनगर
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला प्रचंड असा विजय मिळाला. नगर जिल्ह्यातही दोन्ही जागा आम्ही निवडून आणल्या. विधानसभेसाठीही सध्या पोषक वातावरण असून, विधानसभेत युतीला ऐतिहासिक विजय मिळणार असल्याचा दावा राज्याचे माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात विखे पत्रकारांशी बोलत होते. सुजय विखे भाजपकडून खासदार झाल्यानंतर नुकतेच राधाकृष्ण विखेंनीही आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे. विखेंना कोणते मंत्रिपद मिळणार याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, भाजपात मी प्रवेश करायचा की नाही?, त्यानंतर मला मंत्रिपद द्यायचे की नाही?, दिले तर कोणते? याबाबत पक्षश्रेठींचा निर्णय अंतिम राहील.
मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अंतिम निर्णय घेतील. केंद्रात मोदी सरकार येणार ही अनेकांना अतिशयोक्ती वाटली. पण सरकार आलेच. त्याचप्रमाणे आतापर्यंतचा सर्वात मोठा असा ऐतिहासिक विजय मिळेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. अनेकांना ही अतिशयोक्ती वाटू शकेल.
राज्यात  शेतकरी दुष्काळाने खचला आहे. दुष्काळाला राज्य सरकारनं जबाबदार नाही. विरोधीपक्षनेते म्हणून मी माझी भूमिका प्रामाणिकपणे बजावली. त्यामुळे दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांचं शहराकडे होणारं स्थलांतर रोखने, रोजगार हमीवरील मजुरांना काम देऊन त्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागरिकांचे लोंढे शहरात स्तलांतरित होताहेत. यावर राजकारण बाजूला ठेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे सक्षम असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर मी समाधानी आहे, अशा शब्दात विखेंनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post