दाभोळकरांवर आम्ही गोळया झाडल्या; कळसकरची कबुली


वेेेब टीम : पुणे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्याने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. मी व सचिन अंदुरेने गोळीबार केला असे कळसकरने सीबीआयने केलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत म्हटले आहे.
सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचे सुद्धा नाव घेतले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात वकील संजीव पुनाळेकर सुद्धा अटकेत आहेत. रविवारी पुणे न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मागच्यावर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मला दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता अशी कबुली कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिला आहे. सीबीआयने २५ मे रोजी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना दाभोळकर हत्या प्रकरणात अटक केली.
फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सुर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post