पत्नी असलेल्या अभिनेत्रीला करायचा मारहाण; न्यायालयाने घातली घरात प्रवेश करण्यास बंदी


DNALive24 :
दारू पिऊन बायकोला सतत मारहाण करणाऱ्या नवऱ्याला न्यायालयाने ते दोघे राहात असलेल्या घरात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. मालिकांमध्ये काम करणारी आणि बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री आरजू गोवित्रीकर हिने काही महिन्यांपूर्वी नवऱ्याविरोधात वरळी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी दादरच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरजूचा नवरा सिद्धार्थ सभरवाल याला आरजू आणि सिद्धार्थ राहात असलेल्या घरामध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

2010 साली आरजू आणि सिद्धार्थ यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांना सिद्धार्थने दारू पिऊन आपल्याला मारहाण करायला सुरुवात केल्याचं आरजूने पोलीस तक्रारीत म्हटलं होतं. ही मारहाण असह्य झाल्याने फेब्रुवारी महिन्यात आरजूने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलीस तक्रारीनंतर हे प्रकरण महानगर दंडाधिकाऱ्यांच्या दारात पोहोचलं होतं. न्यायाधीशांनी आरजूची बाजू ऐकून घेत आणि तिने सादर केलेले पुरावे पाहात सिद्धार्थ सभरवाल याला ते दोघे राहात असलेल्या वरळीतील सर पोचखानवाला रस्त्यावरील घरात प्रवेशबंदी केली आहे.

15 फेब्रुवारी रोजी आरजूला तिच्या नवऱ्याने मारहाण केली होती. याबाबतची तक्रार तिने 19 फेब्रुवारीला नोंदवली होती. आरजूने सीसीटीव्ही दृश्ये देखील पोलिसांत दिली होती. पहाटे चार वाजता दारू पिऊन झिंगलेल्या सिद्धार्थने आपल्याला बाथरूममध्ये फरफटत नेलं आणि तिथे बेदम मारहाण केली असं आरजूने पोलीस तक्रारीत म्हटलं होतं. बाथरूममध्ये ओढत नेऊन मारहाण करण्याआधी आपल्याला सिद्धार्थने कानाखाली मारल्या होत्या असं आरजूने म्हटलं आहे. हॉलमध्ये झालेली ही मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. सिद्धार्थ सभरवालने त्याच्या बचावासाठी जे विधान केलं होतं त्यात तो म्हणाला होता की आरजूने मला कानाखाली मारायला सांगितली होती. एका मालिकेतील दृश्याची रंगीततालीम करण्यासाठी तिनेच मला मारायला सांगितलं होतं असं सिद्धार्थ म्हणाला होता.

न्यायाधीशांनी सिद्धार्थला घरात प्रवेश करण्यावर बंदी घालताना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला आहे. नवऱ्याच्या मालकीचं घर असलं तरी त्याला बायका-मुलांना मारहाण करण्याचा अधिकार नाही. जर अशा प्रकारचा हिंसाचार होत असेल तर बायको आणि मुलांच्या सुरक्षेसाठी नवऱ्याच्या घरप्रवेशावर बंदी घातली जावी असं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले होते. या आदेशावर प्रतिक्रिया देण्यात आरजू गोवित्रीकर आणि सिद्धार्थ सभरवाल यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचं मुंबई मिरर या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates