फेसबुकवरील ओळखीतून डॉक्टरला ९ लाखांचा गंडा


वेब टीम, पुणे
शहरातील एका नामांकित रूग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीची फेसबुकवरुन झालेल्या ओळखीतून नऊ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत २५ वर्षीय डॉक्टर युवतीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारादार युवती सध्या एरंडवणे भागात वास्तव्यास आहे. ती मूळची आंधप्रदेशातील काकीनाडा भागातील रहिवासी आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, हर्षा चेरकुरी उर्फ वामसी मनोहर जोगडा याच्यासह एक महिला तसेच बँक खातेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी तिची फेसबुकच्या माध्यमातून हर्षा चेरकुरीशी ओळख झाली होती. त्यानंतर चेरकुरीने सामाजिक कार्य करत असल्याची बतावणी तिच्याकडे केली होती. दरम्यान, त्याने युवतीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. चेरकुरीने सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला ३० हजार रूपयांची मदत करण्यास युवतीला सांगितले. युवतीने त्याच्यावर विश्वास ठेवत चेरकुरीने सांगितलेल्या बँक खात्यात पैसे भरले. दरम्यान, चेरकुरीने पुन्हा तिच्याकडे बतावणी केली. वेळोवेळी तिच्याकडून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला मदत करायची आहे, अशा बहाण्याने पैसे उकळले.

दरम्यान, युवतीने ६ जून रोजी चेरकुरीचे फेसबुकवरील खात्याची पाहणी केली. तेव्हा चेरकुरीने त्याच्या काही मित्रांना ‘ब्लॉक’ केल्याचे निदर्शनास आले. त्यात अशोक गलपल्लीचे नाव होते. अशोक आणि चेरकुरीचे फेसबुकवरील खात्याची तिने पाहणी केली. तेव्हा दोघांच्या चेहऱ्यात साम्य आढळून आले. त्यानंतर तिने अशोकचे फेसबुक खाते पुन्हा तपासले. तेव्हा ‘वामसी मनोहर जोगडा’ हा युवतींची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचा संदेश अशोकच्या खात्यावर टाकण्यात आल्याचे उघडकीस आले. युवतीने अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post