'एक देश, एक निवडणूक' : पंतप्रधानांनी बोलविली सर्वपक्षीय अध्यक्षांची बैठक


वेब न्यूज : दिल्ली
'एक देश, एक निवडणूक' या मुद्द्यावर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. संसद भवनात 19 जून रोजी ही बैठक पार पडेल. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी ही माहिती दिली.
या बैठकीत पंतप्रधान मोदी एक देश, एक निवडणूक, महात्मा गांधी यांची 150 व्या जयंतीशी संबंधित सर्व कार्यक्रमांबाबत चर्चा करणार आहेत. तसंच पंतप्रधानांनी 20 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभा खासदारांचीही बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदींना संसदेत टीम स्पिरीट निर्माण करायचं आहे, असं प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.
सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत प्रल्हाद जोशी म्हणाले की, "विरोधी पक्षांसह मित्रपक्षांकडूनही सूचना मिळाल्या आहेत. यंदा संसदेत अनेक नवे चेहरे आले आहेत, त्यांच्याकडून आलेल्या विचारांचा समावेश व्हायला हवा."
2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याशिवाय यावर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी होत आहे. याबाबतच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी तसंच जिल्ह्याशी संबंधित मुद्द्यावर विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली आहे, असं असंही प्रल्हाद जोशी म्हणाले.
दरम्यान, आजपासून (17 जून) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून 17 जुलैपर्यंत सुरु राहिल. अर्थमंत्री निर्मला सीतारमन 4 जुलै रोजी आर्थिक पाहणी अहवाल मांडतील आणि 5 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates