भगवा ध्वज हाच माझा गुरू; वाघ-सिंहाची जोडी एकत्र आलीय : मुख्यमंत्री फडणवीस


वेब न्यूज
वाघ सिंहाची जोडी एकत्र येते त्यावेळी कुणी राज्य करावं हे सांगावं लागत नाही. आम्हाला सत्ता पदांकरिता नको आहे तर लोकांच्या सेवेसाठी हवीय. आमच्यासाठी मुख्यमंत्री पद हे गौण आहे, असे प्रतिपादन  देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, आपण सगळे भगव्यासाठी लढणारे आहोत. माझा गुरु हा भगवा ध्वज आहे. आपण व्यापक हिंदुत्वाने प्रेरित आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जाणार की नाही? यावरून चर्चा झाली. हा प्रश्न मला निमंत्रण देताना उद्धवजींना पडला नाही आणि आमंत्रण स्वीकारताना माझ्याही मनात आला नाही, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा आशीर्वाद, उद्धवजींचं प्रेम आणि शिवसैनिकांची ऊर्जा घ्यायला आलोय, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही युती महाराष्ट्रात आणि भारतात सर्वात जास्त काळ चाललेली युती आहे. घरात दोन भाऊ एकत्र राहतात त्यावेळी ताणतणाव होतोच. अनेकांची इच्छा होती की तणाव जावा आणि एकत्र यावं. आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो. वाघ सिंहाची जोडी एकत्र येते त्यावेळी कुणी राज्य करावं हे सांगावं लागत नाही. वाघ सिंह एकत्र आल्यावर जनता कुणाला कौल देणार हे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, युतीच्या यशाचे शिल्पकार शिवसेनेचे सैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत. मला शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमात जाताना दुसरीकडे जातोय असे वाटत नाही, आपल्या घरी येतोय असेच वाटते. आपण सगळे भगव्यासाठी लढणारे लोक आहोत असे ते म्हणाले. माझा गुरु हा भगवा ध्वज आहे. आपण व्यापक हिंदुत्वाने प्रेरित आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. निवडणुकीसाठी आम्ही एकत्र आलेलो नाही तर देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी एकत्र आलोय. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भूतो न भविष्यती विजय मिळणार असल्याचे देखील ते म्हणाले.
मुख्यमंत्री कोण ह्या चर्चा माध्यमाला करू द्या, माध्यमाला रोज एक प्रश्न लागतो. शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवा, आपल्याला प्रचंड बहुमताने आपलं सरकार आणू. आम्ही सगळे निर्णय घेतलेले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. सत्ता आल्यानंतर ठरवू, असे मुख्यमंत्री म्हणाले. दोन्ही पक्ष एकच आहेत अशी भावना ठेवून निवडणुकांना सामोरे जाऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates