दुष्काळात नगरमध्ये गावासाठी मंजूर असलेल्या टँकरची परस्पर विक्रीवेब टीम, अहमदनगर
दुष्काळात जनता पाण्यासाठी दाही दिशा भटकत असतांना नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे गावासाठी मंजूर असलेला पाण्याचा टॅंकर दुसऱ्या गावात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र सरपंच यांचा मुलगा व ग्रामसेवक यांच्या संगनमताने शासकीय टँकरच्या पाण्याची परस्पर विक्री होत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य भरत साहेबराव बोडखे यांनी प्रांत आधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी पं. समिती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत कठोर कारवाई न झाल्यास दि .७ जुन रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्याल आला आहे.

भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने निमगाव वाघा ( ता. नगर ) येथे शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाच्या आदेशानुसार घरासमोर असणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरून देणे क्रमप्राप्त असताना टँकरचे पाणी सरपंच सुमन डोंगरे व ग्रा.पं. कर्मचारी यांच्या नातेवाईकांच्या विहीरीमध्ये खाली करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेला पाणी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ज्यांना पाण्याची नितांत गरज आहे असे लोक टँकरच्या पाण्यापासून वंचित राहत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गावात पाण्याची तीव्र टंचाई असताना सरपंच सुमन डोंगरे यांचा मुलगा व ग्रामसेवक मॅडम अंजुम शेख यांच्या संगनमताने निमगाव वाघा या गावासाठी येणारा पाण्याचा टँकर शेजारील नेप्ती गावात आर्थिक लाभा पोटी विकला जात आहे. याबाबतचा जाब विचारला असता दमदाटी व शिवीगाळ करण्यात येत आहे. याबाबत ग्रामसेवक यांना दुरध्वनीद्वारे संपर्क करण्यात असता ते कोणतेही उत्तर देत नाहीत असे तक्रारीत म्हटले आहे.

जनतेला पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांत व ग्रा.पं. कर्मचाऱ्यांत वादविवाद होऊन पोलीस केस झाली होती. पाणीपुरवठा अधिकारी बेळगे भाऊसाहेब व तुपे

यांच्यासमोर वाद मिटविण्यात आले. मात्र पुन्हा जनतेचे पाणी पळविण्याचा प्रकार सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने होत आहे. सरपंचाचा मुलगाच गावचा कारभार पाहत असून तो अरेरावी करत आहे. ग्रामस्थ व ग्रा.पं. सदस्यांना विचारात न घेता मोठया प्रमाणावर गैरव्यवहार केला जात आहे. याबाबतची तक्रार प्रांत आधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून संबधीतावर कठोर कारवाई न केल्यास नगर - कल्याण मार्गावर दि .७ जुन रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रा .पं. सदस्य भरत साहेबराव बोडखे, अरुण बाबुराव फलके, गोकुळ लक्ष्मण जाधव, लता अरुण फलके व मिना मच्छिंद्र कापसे यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post