नगर जिल्ह्यातील ७० तरुणांना परदेशात याेग प्रशिक्षकाचा राेजगार


वेब टीम, अहमदनगर
जिल्ह्यातील संगमनेर परिसरात दगड फाेडण्याचे काम करणारे अल्पशिक्षित तरुण आता चीन, व्हिएतनाम, मलेशिया, मकाऊ, कंबाेडिया आणि अन्य देशांत याेग प्रशिक्षक म्हणून कार्यरत हाेऊ लागले आहेत. माेक्ष याेग संस्थेचे संस्थापक देवा म्हालू व त्यांची पत्नी वंदना म्हालू यांच्या प्रयत्नातून ही किमया साधली गेली आहे.

 दगड फाेडण्यासाठी हाताेड्यावर कठाेर घाव घालणारे या तरुणांचे हात आता विविध याेगमुद्रेत गुंतले गेले आहेत. नगरसह राज्याच्या अन्य भागांतून आलेले माेक्ष याेग संस्थेतील १०० युवक परेदशात याेग प्रशिक्षक म्हणून कार्यरत झाले आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील ७० जणांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील अपुऱ्या पाऊसमानात येथील तरुणांना शेतजमीनीतून उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांच्यापुढे राेजगारासाठी दगड फाेडण्याशिवाय पर्याय नव्हता.

अशा परिस्थितीत समनापूर (जि. नगर) या दुष्काळी गावातील देवा म्हालू यांनी गावातील तरुणांना याेगमध्ये चांगल्या पगाराचे व प्रतिष्ठेचे करिअर म्हणून पर्याय उभा केला आहे. संगमनेर महाविद्यालयातून बीए मराठीपर्यंत शिक्षण घेतलेल्या देवा यांनी डिप्लाेमा याेगा व नॅचराेपथीचा काेर्स केला. विविध ठिकाणी काम केल्यानंतर त्यांना दुबईत याेग प्रशिक्षकाची मागणी असल्याचे कळाले व त्यंाना परदेशात काम करण्याची संधी मिळाली. यादरम्यान पत्नी वंदनालाही दुबईत याेग प्रशिक्षक म्हणून कामाची संधी मिळाली. म्हालू यांनी अहमदाबादेत ‘इटर्नरी वेलन्स प्रा.लि. ही देशातील याेगामधील पाहिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. वाढत्या बेरोजगारीत याेग प्रशिक्षक हा उत्तम पर्याय असल्याचे म्हालू म्हणाले.

योग प्रशिक्षकाची पदविका १ वर्षाच्या काेर्सद्वारे दिली जाते. पहिल्या तुकडीत ३२ युवकांना प्रशिक्षित केले असून यातील ८५% युवकांना परदेशात योग प्रशिक्षक म्हणून नाेकरीही मिळाली आहे, आतापर्यंत एकूण १३ बॅचमधील २५० जणांना अमेरिका, कॅनडा, रशिया, चीन, व्हिएतनाम, जपान, आॅस्ट्रेलिया या देशात याेग प्रशिक्षक म्हणून काम मिळाल्याने त्यांचे जीवनमान बदलून गेले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post