आरबीआयला दुसरा धक्का; डेप्युटी गव्हर्नर आचार्य यांचा राजीनामा


वेब टीम : दिल्ली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सात महिन्यात दुसरा धक्का बसला आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे सेवा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या ६ महिने अगोदरच त्यांनी पद सोडले आहे. याआधी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला होता.
गेल्या वर्षी २६ ऑक्टोबर रोजी आचार्य यांनी आरबीआयची स्वायत्तता कायम रहावी, याबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. गेल्या वर्षी केंद्र सरकार आणि आरबीआयमधील वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे याआधी उर्जित पटेल गर्व्हनर पदावरून पायउतार झाले. आता  डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनीही पद सोडले आहे.
आचार्य २३ जानेवारी २०१७ रोजी आरबीआयमध्ये रुजू झाले होते. ते सर्वात कमी वयाचे डेप्युटी गव्हर्नर बनले होते. मात्र, त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आचार्य न्यूयॉर्क विद्यापीठात शिकवण्यासाठी जाणार असून त्यांचे कुटुंबीय देखील न्यूयॉकमध्ये रहात असल्याचे समजते.
पतधोरण आढाव्यादरम्यान आर्थिक विकास, महागाई या दोन मुद्यांवर त्यांनी वेगळे मत मांडले होते. तसेच आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्यात आर्थिक तोटा आणि त्यांचा योग्य अंदाज आदी मुद्यांवर असहमती दिसून आली होती.
त्यात आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एन. विश्वनाथन यांचा कार्यकाळही आता संपणार आहे. मात्र आता आचार्य यांनी राजीनामा दिल्याने विश्वनाथन यांचा कार्यकाळ वाढविण्यावर विचार केला जाण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates