अनैतिक संबंधास नकार दिल्याने विवाहितेचा खून


वेब टीम : अहमदनगर
अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या रागातून अविवाहित युवकाने विवाहितेवर चाकूने  वार करून तिचा  खून घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे शुक्रवारी ( दि.२८ ) रात्री सात वाजण्याच्या सुमारास हे घटना घडली. याप्रकरणी शनिवारी पहाटेच्या सुमारास पारनेर पोलिसांनी आरोपी गोविंद उर्फ पप्पू सुरेश चव्हाण (रा. कोहकडी, ता. पारनेर) यास मुंबई येथे ताब्यात घेतले आहे.

संध्या सुभाष गव्हाणे (वय २४, रा. कोहकडी, ता. पारनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. गव्हाणे कुटुंबीय कोहकडी परिसरात मोलमजुरीचे काम करतात. त्यांच्या घरासमोर राहणारा गोविंद उर्फ पप्पू हा विवाहित संध्या हिच्यावर वाईट नजर ठेवत होता. सदर विवाहित महिला पाणी आणण्यासाठी गेली असता तिची छेडछाड करीत होता. शरीरसंबंधाची मागणी करून पळून जाऊ, असे म्हणत होता. ही बाब संध्या हिने तिच्या पतीला सांगितली होती. संध्या हिचा पती सुभाष गव्हाणे याने गोविंद उर्फ पप्पू व त्याच्या आई-वडिलांना दोन वेळेस समजावून सांगितले होते. तरीही पप्पू याच्याकडून संध्याला त्रास दिला जात होता.

तिच्याकडून अनैतिक संबंधास विरोध केला जात असल्याच्या रागातून शुक्रवारी रात्री गोविंद ऊर्फ पप्पू चव्हाण याने संध्या गव्हाणे यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर तो पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेतील संध्या हिला उपचारासाठी तातडीने शिरूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी संध्या हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. खुनाच्या घटनेनंतर गोविंद चव्हाण हा पळून गेला.

याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात मयत महिलेचे पती सुभाष राजू गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून गोविंद उर्फ पप्पू सुरेश चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पप्पू हा मुंबई येथे गेल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावरून मुंबई येथून पारनेर पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates