मिसेस मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात


वेब टीम : मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री व माझे पती देवेंद्र फडणवीस यांच्यासह मित्रपक्षांचाही प्रचार करू. आम्ही चांगले काम करीत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी जनता जो कौल देईल तो आम्हाला मान्य असेल, असे मत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व स्लम सॉकर या क्रीडा विकास संस्थेच्या पॅट्रन अमृता फडणवीस यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केले.

मुंबई प्रेस क्लब येथे स्लम सॉकरने कार्डिफ होमलेस फुटबॉल विश्वचषक 2019 स्पर्धेची माहिती सांगण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार माहीत नाही; पण त्यांचा व मित्रपक्षांचा मी प्रचार करणार आहे. आज मुख्यमंत्रिपदासाठी वेगवेगळी नावे पुढे येत आहेत, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी रोज नवनवीन नावे पुढे येतील. मुख्यमंत्र्यांनी गेल्या साडेचार वर्षांत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जनता आमच्या सोबत राहील, असे त्यांनी सांगितले.

कार्डिफ येथे 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2019 या कालावधीत होमलेस विश्वचषक ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी भारतीय पुरुष व महिला फुटबॉल संघ सज्ज असल्याची माहिती स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांनी या पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेत अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर समर्पक उत्तरे दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post