बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असणा-या खाजगी वैद्यकीय व्‍यावसायिकांचे रुग्‍णालये तपासणी करुन विनानोंदणीकृत खाजगी किंवा बोगस वैद्यकीय व्‍यवसाय करणा-या व्‍यावसायिकांवर तात्‍काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आरोग्‍य यंत्रणेला दिले आहेत.

यासंदर्भात जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्‍हास्‍तरीय बोगस वैद्यकीय व्‍यावसायिक शोध समितीची आढावा बैठक जिल्‍हा परिषदेचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मुरंबीकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संदिप सांगळे, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. नागरगोजे, महाराष्‍ट्र कॉन्‍सिल होमॅओपॅथिचे अध्‍यक्ष डॉ. अजित फुंदे तसेच आरोग्‍य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भोर म्‍हणाले की, ग्रामीण व शहरी हद्दीतील बोगस वैद्यकीय व्‍यावसायिकांची माहिती संबंधित यंत्रणाकडून प्राप्‍त करुन समितीसमोर वेळोवेळी ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच वैद्यकीय व्‍यवसाय करणारे व्‍यवसा‍यिक दोषी आढळल्‍यास तात्काळ गुन्‍हे दाखल करण्‍याचे आदेश त्‍यांनी यावेळी तालुकास्‍तरीय बोगस वैद्यकीय व्‍यावसायिक समिती, आरोग्‍य यंत्रणा व जिल्‍हा पोलीस प्रशासनाला दिले. बोगस वैद्यकीय व्‍यावसायिकांविरुद्ध संबंधित न्‍यायालयात खटले दाखल करण्‍याची रितसर कार्यवाही पोलिसांमार्फत करणे. बोगस वैद्यकीय व्‍यवसायिकांबाबत न्‍यायालयात दाखल करण्‍यात आलेल्‍या प्रकरणांचा नियमित आढावा घेण्याबाबतच्‍या सूचना पोलीस प्रशासन व अधिका-यांना दिल्‍या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post