भारतीय विमानांसाठी पाकची हवाई हद्द आता खुली


वेब टीम : दिल्ली
बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी बंद केलेली हवाई हद्द अखेर आज खुली केली आहे. ही बंदी १५ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता.

बालाकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण हवाई हद्द बंद केली होती. २७ मार्च रोजी पाकिस्तानने नवी दिल्ली, बँकॉक आणि कौलांलापूर वगळून अन्य सर्व विमानासांठी हवाई हद्द खुली केली होती. १५ मे रोजी पाकिस्तानने भारतासाठी ही बंदी ३० मे पर्यंत वाढविली होती. याबाबत विमान उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार ही बंदी १५ जूनपर्यंत वाढविण्यात आली होती.

दरम्यान, पश्चिमेकडील हवाई हद्द सर्व देशांसाठी खुली ठेवण्यात आली होती. एअर इंडियाची विमाने याच हद्दीचा वापर करीत होती.  शांघाय सहकार्य परिषदेची २१ मे रोजी किरगिझस्तानमध्ये बैठक झाली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे विमान पाकिस्तानी हद्दीतून जाऊ देण्यास पाकिस्तानने परवानगी दिली होती. मात्र अन्य विमानांसाठी या हद्दीतून जाण्यावर बंदी कायम ठेवण्यात आली.

या बंदीमुळे पाकिस्तानी हद्दीतून जाता येत नसल्याने परदेशी विमानांना लांबचा वळसा घालून भारतात यावे लागत होते. विशेषत: युरोपातून दक्षिणपूर्व आशियात येणाऱ्या विमानांना या निर्णयाचा मोठा फटका बसला होता.

अमेरिका आणि युरोपातून येणाऱ्या आणि दिल्लीतून तिकडे जाणाऱ्या विमानांना या बंदीचा मोठा फटका बसला होता. भारतीय विमानांवर बंदी असल्याने हजारो प्रवाशांना विमान रद्द होणे, उड्डाणांना विलंब होणे आणि तिकिटांच्या किमतीत प्रचंड वाढ होणे या सारख्या बाबींना सामोरे जावे लागत होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post