कोपरगावात काळे- कोल्हेचे टेन्शन वाढणार ; परजने विधानसभेच्या मैदानात


वेब टीम : अहमदनगर
50 वर्षांपासून तालुक्याचे पाटपाणी, शेती, बेरोजगारी, वीज, रस्ते आदी मुलभूत प्रश्‍न रखडले आहेत. आगामी विधानसभा सुद्धा याचा प्रश्‍नांवर लढविली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनीही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परजणे यांच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकारणातील 'विखे पॅटर्न' या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.
परजणे म्हणाले की, तालुक्याच्या प्रस्थापित नेत्यांच्या भोवती राजकारण नेहमी फिरत असून तालुक्याच्या अधोगतीस पूर्णतः तेच जबाबदर आहेत. 50 वर्षे त्यांना सत्ता दिली. आता मला पाच वर्षे संधी द्या, तालुक्याचे जिव्हाळ्याचे प्रश्‍न मार्गी लावून दाखवतो. तीन वर्षांत प्रश्‍न मार्गी लागले नाही, तर मी जाहीरपणे राजीनामा देण्यास तयार आहे. आम्ही ज्या पक्षात राहून त्यांचे कार्य केले. पक्ष वाढवले. मात्र पक्षाने आम्हाला कधीच न्याय दिला नाही. त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. मतदारांशी कायम जवळीक ठेवली आहे. कार्यकर्ते व सर्वसामान्यांच्या मनात तालुक्याचा विकास परजणे करू शकतात, ही भावना निर्माण झाली आहे. नागरिक प्रस्थापितांना वैतागले आहेत. ज्येष्ठ नेते कै. नामदेवराव परजणे यांनी माजी खा. कै. बाळासाहेब विखे यांच्या आग्रहाखातर शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी कोपरगावातील दोन्ही प्रस्थापित नेते आमदार व मंत्री झाले. मग 25 ते 30 वर्षांत त्यांनी कोणता विकास केला, हा प्रश्‍न जनतेपुढे आहे.
तालुका मागे जाण्याची प्रमुख तीन करणे असून त्यात पाटपाणी, बेरोजगारी व दुष्काळाने पिचत चाललेला शेतकरी यांचा समावेश आहे. तालुका पुन्हा सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी विखेंच्या मदतीने आपण निश्चित प्रयत्न करू. आज राज्यात कुठलाही चमत्कार घडू शकेल, असे पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नामदार विखे व डॉ. सुजय विखे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ. तालुक्यातील नागरिकांची नस आपण ओळखली असून त्या दृष्टिकोनातून माझे व परजणे गटाचे काम सुरु आहे. कै. नामदेवराव परजणे यांच्या नंतर 20 वर्षे मी तालुक्याचे प्रश्‍न व जनसामान्यांशी नाळ जुळवली असून आता माझी विधानसभेला कार्यकर्ते व वडिलधारे असलेल्या विखेंच्या  पाठबळामुळे तयारी झाली आहे.
राज्यातील प्रमुखमंत्री, नेत्यांची भेट घेऊन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची, ते ठरवू. अन्यथा 31 ऑगस्ट रोजी परजणे व विखे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांना साकडे घालण्यात येणार आहे, असे राजेंद्र जाधव यांनी सांगितले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष संजय खांडेकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, परजणे हे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे तर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांचे धाकटे बंधू आहेत. कोपरगाव मतदारसंघस्त स्नेहलता कोल्हे या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे विखे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post